महाविकास आघाडीचे अ’समाधान’…पंढरपुरात ‘भगीरथ’ रोखला

मनोहर निकम ब्युरो चीफ, महाव्हाईस् न्यूज.

न्यूज डेस्क :-  पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान अवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा तीन हजार ७१६ मतांनी पराभव केला.पहिल्या फेरीपासून शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत हा सामना अगदी अटीतटीचा झाला.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीने आणि विरोधी पक्ष भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.या निवडणुकीत हा विजय म्हणजे जनतेने ठाकरे सरकारविरोधात दिलेला कौल आहे,अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार समाधान अवताडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवली.मात्र सातव्या फेरीपासून अवताडेंनी जी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम टिकवून ठेवली.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक लागली. तेव्हा राष्ट्रवादीने भारत भालके यांचेच पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरची उमेदवारी दिली त्यामुळे सहानुभूतीच्या लाटेत जनता भगीरथ भालके यांना साथ देते, की डाव पलटवून समाधान अवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ घालते याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागून होते.अखेरीस येथील जनतेनी महाविकास आघाडीला असमाधानकारक साथ देत विजयी होऊ पाहणाऱ्या भगीरथाला रोखले.

 पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. गेल्या महिन्याभरात करोनाच्या निर्बंधांमध्ये देखील पंढरपूरसाठी या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती.