महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाच्या वतीने नारायणगावात उपोषण…

राजगुरूनगर ( पुणे ) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय गेले तर काहींचे ठप्प झाले यात हातावर पोट असलेल्या तमाशा फड मालक व कलावंतांची अवस्था बिकट झाली आहे.

राज्य सरकारची मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाचे पदाधिकारी नारायणगाव येथील स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसणार आहेत.अशी माहिती ज्येष्ठ तमाशा फडमालक व या संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी दिली.

यात्रा जत्रांच्या काळातच कोरोनामुळे तमाशाचा फडांचा हंगाम वाया गेला त्यामुळे फड मालकांसह कलावंतांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.या काळात राज्य शासनाने कलावंतांना भरीव अशी मदत केली नाही या कारणामुळे राज्यात आपली तमाशा कला सादर करणाऱ्या सुमारे पंचेचाळीस हजार कलावंतांची उपासमार सुरू आहे.

तमाशा कलावंतांना मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा, पत्रव्यवहार केला तरीही शासनाने दखल न घेतल्यामुळे दि २१ सप्टेंबर पासून नारायणगाव येथे साखळी उपोषण करणार असल्याचे रघुवीर खेडकर यांनी सांगितले.

या उपोषणाला विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मालती इनामदार नारायणगावकर, विठाबाई यांचे पुत्र कैलास व राजेश नारायणगावकर, संघटनेचे सचिव मुसाभाई इनामदार, उपाध्यक्ष राजू बागुल, विशाल नारायणगावकर, शांताबाई संक्रापूरकर, शाहीर संक्रापूरकर, संजय महाडिक, संगीता महाडिक, विनायक महाडिक, मिथुन लोंढे, महेश बांगर आदी पदाधिकारी या उपोषणाला बसणार आहेत. अशी माहिती रघुवीर खेडकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here