परतीचा पाऊस भातशेतीच्या मुळावर, सलग तिसऱ्या वर्षी भातशेतीचे नुकसान…

परतीच्या पावसाने मनोर परिसरात भातशेतीचे नुकसान, कापणीला आलेले भातपिक लोळवले.

मनोर – गेल्या दोन दिवसांपासून पालघर तालुक्यातील मनोर परिसरात परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे.वारा आणि ढगांच्या गडगडाटासह बरसणाऱ्या पावसाने हातातोंडाशी आलेले भातपिक लोळवले आहे.परतीच्या पावसाने कापणीला आलेल्या भातपिकाच्या नासाडीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ताळेबंदी मुळे शेतकरी भरडला गेला होता. अशात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडली आहे.त्यामुळे नुकसान भरपाईसाठी कृषी आणि महसूल विभागाकडून भातपिकाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सलग तीन वर्षांपासून खरीप हंगामात भातपिकाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.दोन वर्षांपूर्वी परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने भातपिकं करपली होती.गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने हाताशी आलेले भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

यंदा मान्सूनची सुरुवात एक महिना उशिरा झाली होती. जुलैनंतर पावसाने दमदार एन्ट्री केली होती. ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला होता.दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हालोली, बोट,कुडे,दुर्वेस, सावरे,सावरखंड आदी गावांच्या हद्दीतील भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.शेतात कापणीसाठी तयार आणि उभ्या पिकाचेही मोठे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

यंदा खरिपातून भरगोस उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु सलग तिसऱ्या वर्षी मान्सुनच्या लहरी पणामुळे मनोर परिसरातील भातपिकाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे येत आहे.

■परतीच्या पावसाने भातशेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी आलेल्या नाहीत.नुकसान झालेल्या भागाची माहिती घेऊन पाहणी करण्यात येईल.
◆तरुण वैती
तालुका कृषी अधिकारी,
पालघर.

■कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात झालेल्या ताळेबंदी मुळे रोजगाराअभावी शेतकरी मेटाकुटीला आले होते.यंदा खरीप हंगामात भातशेतीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता होती.परंतु परतीच्या पावसाने आमच्या आशेवर पाणी फेरले आहे.
■संतोष सातवी,
शेतकरी, हालोली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here