स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुक EVM ऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी पर्याय द्या…विधानसभा अध्यक्षांची सूचना

न्यूज डेस्क – महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कायदा महाराष्‍ट्र विधानमंडळाने तयार करावा, अशा स्पष्ट सुचना दिल्या आहेत. प्रदीप महादेवराव उके यांनी या संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे निवेदन तसेच याचिका सादर केली आहे.

02 फेब्रुवारी, 2021 रोजी विधानभवनातबैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी अर्जदारातर्फे ॲड. सतिश उके यांनी यासंदर्भात निवेदनातील भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की,’राज्यातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याचा विकल्प मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.  मतपत्रिका अथवा ईव्हीएम कोणते माध्यम अधिक विश्वासार्ह आहे.  हे जनतेला ठरवू द्या, यासंदर्भातील जनभावनेची दखल घेऊन कायदा तयार करणे ही विधानमंडळाची जबाबदारी आहे.’

ईव्हीएम संदर्भात अनेक मुद्दे उपस्थित झाले असून अद्यापही जनमानसात या ईव्हीएम कार्यप्रणालीबद्दल साशंकता आहे.  यामुळे मतपत्रिका या पारंपारिक मतदान पत्रिकेचा पर्याय देखील मतदारांना उपलब्ध असला पाहिजे, असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.

भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 328 प्रमाणे राज्यातील निवडणुकांच्याबाबत कायदा तयार करण्याचे अधिकार राज्य विधान मंडळाला आहेत.  अनुच्छेद 328 नुसार राज्य विधानमंडळाला असलेल्या अधिकारानुसार, अनुषंगिक कायदा तयार करुन राज्यातील जनतेला ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेने मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा. 

यानुसार इच्छेनुरुप, मतदार हे  ईव्हीएम किंवा मतपत्रिकाव्दारे मतदानाचा हक्क बजावू शकतील.  मतदानानुसार झालेली निवडणूक आणि निकाल, एकंदरीत सर्व प्रक्रिया यावरील आमजनतेचा विश्वास आणखी दृढ होईल आणि मतदानाची टक्केवारी देखील वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here