भाजी घ्या भाजीच्या नावावर घरोघरी जाऊन होते दारूची विक्री…दारू विक्रेत्यांची चंद्रपूर जिल्ह्यात नवी शक्कल…पाहा व्हिडीओ

प्रशांत देसाई
महाव्हॉईस,ब्युरो

भाजी घ्या भाजी… असे ओरडणाऱ्या भाजी विक्रेत्यांची ही शक्कल आता अवैध दारू विक्रेत्यांनी हायजॅक केली आहे. ऐकून थक्क व्हाल. मात्र, हे सत्य आहे. आता भाजी घ्या भजी… हा आवाज कानावर पडला तर ग्रामस्थ समजून जातात की, भाजीवाला नाही तर, दारु विक्रीवाला गावात आला आहे म्हणून. दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात हा दारूविक्रीचा खुलेआम व्यवसाय सुरू आहे. याला अर्थातच पोलिसांचे अभय असल्याचे बोलले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, सीमेलगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या दारूचा पुरवठा होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आमडी या गावातील बसस्थानक परिसरात अवैध दारू विक्रेता चक्क प्लास्टिकच्या पोतडीत दिवसाढवळ्या भाजीपाला विक्री करावी तसा दारू विक्री करीत असल्याचा एक व्हिडिओ ‘महाव्हॉईस’च्या हाती लागला आहे.

या व्हिडिओमध्ये बिना नंबरच्या दुचाकीचा वापर या अवैध दारू विक्रीसाठी होत असल्याचे दिसून येते. परिसरातील एका गावातील तीन विक्रेते या दुचाकीने नेहमी आमडी, माढेळीच्या परिसरातील गावांमध्ये अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीत दारू भरून गावागावांमध्ये जाऊन फिल्मीस्टाईल फिरून दारूची विक्री करीतात. हे करण्याकरिता ते कधी भेंडी घ्या भेंडी… तर कधी, वांगे घ्या वांगे…. तर कधी, भाजी घ्या भाजी… असे जोराने ओरडून दारू विक्री करतात.

आशा पद्धतीने हे अवैध दारूविक्रेते त्यांच्या नेहमीच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन त्यांना घरपोच दारूचा पुरवठा करतात. आणि उर्वरित दारू विक्रीसाठी गावातीलच भरचौकात आपली दुचाकी उभी करून भाजीपाला विक्री केल्याप्रमाणे खुलेआम दारूची विक्री करतात. याची कल्पना पोलीस प्रशासनाला असूनही ते यांच्यावर कारवाई का करीत नाही ? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. यात पोलिसांचे अवैध दारू विक्रेत्यांसोबत आर्थिक हितसंबंध असल्याची आता चर्चा ग्रामस्थांमध्ये होऊ लागली आहे. चंद्रपूर सारख्या दारूबंदी जिल्ह्यात दारू विक्रेत्यांची ही भाजी घ्या भाजी ची हायप्रोफाईल नवी शक्कल चांगलीच प्रसिध्दीस आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here