आमिर खान आणि किरण राव यांचे पत्र…

सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना आमचा नमस्कार!

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत अतिशय कष्ट घेतल्यामुळे आज आपल्या गावाला पाण्याच्या रुपात बक्षीस मिळाले आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. अशा पाणीदार झालेल्या जवळपास ९०० गावांसाठी पानी फाउंडेशनने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा सुरू केली आहे.

आपण सर्व जण जाणताच की प्रशिक्षण आपल्या सर्व कामाचा आत्मा राहिला आहे. गत स्पर्धेमध्ये प्रशिक्षण घेऊन गावी गेलेल्या प्रशिक्षणार्थींनी अशक्य ते शक्य करून दाखविले. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईलाजाने प्रशिक्षण हे प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रावर न घेता ऑनलाइन पद्धतीने घ्यावे लागले.

आम्हाला खूप आनंद आहे की या संकटाला न घाबरता हजारो जलयोद्ध्यांनी हे प्रशिक्षण गावपातळीवर पूर्ण केले. यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपणास करावा लागला याची आम्हाला जाणीव आहे. अनेक गावांत नेटवर्क मिळत नसे. तरी आपण ज्ञान घेण्याची जिद्द सोडली नाही. काही ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या टाकीवर चढून, तर काही ठिकाणी टेकडीवर चढून रेंज येते तेथे बसून आपण प्रशिक्षण घेतले.

एका गावामध्ये असणारा बसथांबा हा चांगले नेटवर्कचे ठिकाण असल्याने प्रशिक्षण केंद्र बनला. कधी जोराचा पाऊस आला तेव्हा लॅपटॉपवर छत्री धरून आपण प्रशिक्षण पूर्ण केले. अशा आव्हानांना तोंड देत आपण समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचे काम करण्यास सज्ज झालात.

समृद्ध गाव स्पर्धेत अनेक बाबींचा सर्वे करावयाचा होता. हे काम किचकट होते. पण चांगली इमारत बांधण्यासाठी पाया हा मजबूत असावा लागतो हे उमजले असल्यामुळे आपण सर्वांनी हे काम आनंदाने केले. या कामी कुठे तरुण पुढे आले, तर कुठे बचत गटाच्या महिला पुढे आल्या, तर कुठे वडीलधारी माणसं सर्वे करून घेऊन येत होते व आपल्या शाळकरी मुलांना ती माहिती घरी देत होते.

नंतर ती मुलं कोबो ॲपवर ती माहिती भरत होती. अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या कामात हिरीरिने उतरले. प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी या कामास मोठी साथ दिली. जगभर कोरोनाने थैमान घातले असतानादेखील आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी या कामाचा आनंद लुटला व आपलं गाव समृद्ध करण्यासाठी झटलात.

खरंच आपल्या सर्वांच्या या धडपडीला सलाम! यामुळेच समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गावांनी चांगले काम केले आहे अशा गावांचा सन्मान करण्यास आम्ही उत्सुक आहोत. हा गौरव सोहळा मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पध्दतीने दिनांक २२ मार्च २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. सदर सोहळा आपण पानी फाउंडेशनच्या फेसबूक पेजवर https://www.facebook.com/paanifoundation
तसेच पानी फाउंडेशनच्या युट्युब लिंकवर https://www.youtube.com/paanifoundation पाहू शकता. तसेच याचे थेट प्रक्षेपण ABP माझा या वाहिनीवर होईल.

२२ मार्च २०२१ ऑनलाइन गौरव समारंभात आपण निश्चित भेटूच.

आपले नम्र,
आमिर खान
किरण राव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here