शैक्षणिक व आर्थिक क्रांती घडवून छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित शिवजयंती साजरी करू…विनोद पाटील

औरंगाबाद: शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आयोजित जिल्ह्यातील शिवभक्तांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रतिवर्षी प्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील छ्त्रपती शिवरायांच्या सर्व पुतळ्यांवर पुष्पवृष्टी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सर्वजण शैक्षणिक व आर्थिक क्रांती घडवून छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली शिवजयंती यंदा साजरी करू. सर्व अठरा पगड जातींना घेऊन ही शिवजयंती साजरी करायची आहे.

शिवाजी महाराज केवळ एका समाजाचे नव्हते. त्यांना एका समाजापुरते मर्यादित करू नका असे आवाहन यावेळी बोलताना विनोद पाटील(Vinod Patil) यांनी केले.यंदाच्या शिवजयंतीनिमित्त जवळपास दोनशेपेक्षा अधिक गावांतील शिवस्मारकांवर पुष्पवृष्टी होणार आहे. याविषयी झालेल्या बैठकीत आवाहन करण्यात आले की, हेलिकॉप्टरमधून आपण करणार असलेल्या पुष्पवृष्टीसाठी यावर्षी सर्वांनी नव्याने लोकेशन द्यायचे आहेत.

जुन्या लोकेशनमध्ये तफावत आढळून आल्यामुळे सर्वांनी नव्याने पुष्पवृष्टीसाठीचे लोकेशन द्यायचे आहेत. सुयोग्य लोकेशन मिळण्यासाठी तालुकानिहाय प्रतिनिधी यावेळी नेमण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरसाठीचे लोकेशन कशा पद्धतीने घ्यायचे, याची माहितीही यावेळी या सर्व प्रतिनिधी आणि शिवभक्तांना देण्यात आली.या बैठकीला हजर होते ते आणि यातील ज्यांचे-ज्यांचे लोकेशन आपल्याकडे येतील, त्यांच्याच गावांतील शिवस्मारकांवर पुष्पवृष्टी करण्यात येईल. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच ही पुष्पवृष्टी होणार आहे. यावेळी विनोद पाटील म्हणाले, आपण सर्व ठिकाणी आपण हेलिकॉप्टर पोहचवणार आहोत. यावर्षी दोन हेलिकॉप्टरचे नियोजन करण्यात आले आहे.

यातील मुख्य अडचण अशी आहे की, जिल्हा प्रशासन, पोलिस अधिक्षक, पोलीस कमिशनर, तहसीलदार, कलेक्टर व एअरपोर्ट ऑथोरिटीज या सर्वांचे परवाने यासाठी लागतात. त्यासाठी खूप वेळ जातो.त्यामुळे सर्वांनी तात्काळ लोकेशन व इतर बाबींची देऊन माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच शिवजयंतीनिमित्त आपण प्रत्येक वर्षी एक संकल्प करत असतो. यावर्षी ‘आर्थिक व शैक्षणिक क्रांती’ हा संकल्प घेण्याचा निश्चय आपण करणार आहोत. स्वावलंबन आजच्या काळात महत्वाचे आहे.

समाजातील विविध स्तरांना स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल, याकरिता वर्षभर विविध उपक्रम यानिमित्ताने राबवले जातील. माझ्यावतीने देखील ‘युवा डेस्क’ची सुरुवात लवकरात लवकर मी करणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत त्यांना रोजगार निर्मितीसाठी विविध उद्योगासंदर्भात व व्यावसायिक माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बैठकीस मोठ्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती होती.

महाव्हॉईस न्यूज साठी
ऋषिकेश सोनवणे
औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here