नवजात चिमुकलीला झोपडीत बेवारस सोडून आई-वडील पसार…अज्ञात आई-वडिलांवर गुन्हा दाखल…

देवलापार -पुरुषोत्तम डडमल

एका निर्दयी,कठोर हृदय असलेल्या आईने आपल्या एक ते दोन दिवसांच्या पोटच्या गोळ्याला काळ्याकुट्ट अंधारात गवताच्या झोपडीत बेवास सोडून पसार झाल्याची व मन सुन्न करणारी अतिशय दुर्दैवी घटना देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत निमटोला येथे उघडकीस आली आहे.त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

बुधवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास निमटोला येथील सुनिता हंसराज कुमरे ( ४०) ही आपल्या शेतात मुलीसह शेतातील पिकांचे राखणी करिता गेली होती.तिला तिच्या शेतातील झोपडीमध्ये लहान बाळांचा रडण्याचा – आवाज ऐकू आला.इतक्या रात्री लहान बाळाचा आवाज येत असल्याने त्यांनी झोपडीत जावून बघितले असता तेथे मचानावर एक अनोळखी एक ते दोन दिवसाचे जन्मजात स्त्री जातीचे लहान बाळ आढळून आले.आजुबाजुला बाळाच्या आईचा शोध घेतला.परंतु कुणीही दिसून न आल्याने तिला काहीतरी विचित्र घटना घडली असल्याचे जाणवले व तिच्या शेतात असे बेवारस बाळ मिळाल्याने ती घाबरली. तोच तिने ग्रामस्थांच्या माध्यमातून सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली.

लागलीच ठाणेदार प्रविण बोरकुटे हे आपल्या स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. महिला पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी एस घोडके यांनी त्या चिमुकलीला ताब्यात घेतले .व या चिमुकलीच्या आई – वडिलांचा शोध घेतला .परंतु , बाळाचे पालकांचा व नातेवाईकांचा शोध न लागल्याने या बाळाला महिला पोलिस कर्मचारी स्नेहा डोंगरे यांच्या हस्ते सुखरूप बाळाची देखभाल करण्यासाठी मेडीकल हॉस्पिटल नागपूर येथे दाखल करण्यात आले.सध्या बाळ सुखरूप असल्याचे सांगितले जाते.

बाळ अनैतिक संबंधातून ?..

हे बाळ अनैतिक संबंधातून झाले असावे किंवा ते स्त्री जातीचे असल्याने तीला असे बेवारस फेकण्यात आले असावे अशी चर्चा परिसरात होत आहे . तसेच या बाळाचा सुगावा लागू नये किंवा त्याची जंगली श्वापदानी शिकार करावी जेणे करून आपल्यावर काहीही येणार नाही . अशा उद्देशाने या नकोशीला शिवारात अशा पध्दतीने ठेवून तिच्या आईने पळ काढला असावा ,अशी देखील चर्चा परिसरात आहे.

अज्ञात आई – वडिलांवर गुन्हा दाखल…

मानव जातीस न शोभणारे कृत्य करणाऱ्या आई – वडिलांवर सुनिता हंसराज कुमरे यांच्या तोंडी तक्रारीवरून ३१७ भादंवि अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली राकेश नलगुंडवार हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here