अमरावती – कृषी ग्राहकांना ३० ते ६० दिवसात वीज जोडणी,कृषी ग्राहकांच्या थकीत वीज बिलांवर १५ हजार कोटींची सवलत,सौर कृषी वाहिनी द्वारे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास अखंडित वीज पुरवठा देण्याचे लक्ष्य, पाच वर्षात ५ लाख सौर कृषी पंपांचे वाटप अशा महत्वपूर्ण व महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा कायापालट करण्याची क्षमता असणाऱ्या महावितरणच्या महाकृषी ऊर्जा अभियानाचा प्रारंभ २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी करण्यात आला.
यानिमित्त अमरावती जिल्ह्यातील ०५ शेतकऱ्यांना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी मागणीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये वाटपूर येथील शेतकरी संजय दिवान, गुरूदेव नगर तिवसा येथील शेतकरी साहेबराव बाबरे,भातकूली येथील शेतकरी संजय पवार आणि बेलखेडा(मोर्शी) येथील शेतकरी श्रीमती संगीता मंत्री यांचा समावेश आहे.
यावेळी अधिक्षक अभियंता अमरावती जिल्हा यांनी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला,त्यांना महाकृषी अभियानाची माहिती दिली. वीज जोडणीसाठी काही अडचणी आल्यास त्याचे तात्काळ निवारण करण्यात येयील अशी ग्वाही देत त्यांना लवकरात लवकर पैसे भरून वीज जोडणी घेण्याचे आवाहन केले.