Friday, September 22, 2023
Homeराज्य‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ पॉवर @2047 चा शुभारंभ, विविध मान्यवरांची उपस्थिती...

‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ पॉवर @2047 चा शुभारंभ, विविध मान्यवरांची उपस्थिती…

अमरावती – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि जिल्हा प्रशासनामार्फत ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ पॉवर @ 2047 या उर्जा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. गेल्या आठ वर्षात उर्जा क्षेत्रातील देदिप्यमान कामगिरीचा वेध घेण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यात आज मोर्शी येथेही स्वतंत्र कार्यक्रम झाला. 

नियोजन भवनात शुभारंभ सोहळा झाला. आमदार सुलभाताई खोडके अध्यक्षस्थानी होत्या. आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, सुनील राणा, महावितरण प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता महावितरण पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता पारेषण जयंत विके, उपव्यवस्थापक दीपक जैन, मयुर मेंढेकर, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, दीपक देवहाते, सुनील शेरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अर्थचक्राला गती देण्यात ऊर्जेची भूमिका महत्त्वाची – आमदार सुलभताई खोडके

तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या अर्थचक्राला गती देण्यात ऊर्जेची भूमिका महत्त्वाची आहे. वीज नसेल तर विकास थांबतो. त्यामुळे विकासाची जननी असलेल्या ऊर्जा विकासात ऊर्जा विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभाताई खोडके यांनी केले. 

उज्ज्वल भारत उज्ज्वल महोत्सवातून वीज क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा जागर – आमदार प्रविण पोटे पाटील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा एक भाग म्हणून देशाची वाटचाल अपारंपरिक ऊर्जा निर्मितीकडे झाली आहे. ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल महोत्सवा’त वीज क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा जागर करण्यात आला आहे. ही बाब प्रशंसनीय आहे.

याचाच एक भाग म्हणून ऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या घरावर सौर पॅनेल बसवून इतरांनाही प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन आमदार प्रविण पोटी पाटील यांनी केले. वादळ, वारा पावसात अविरत काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले.

मेळघाटातील अती दुर्गम भागातील 7 गावांच्या विद्युतीकरणात उर्जा विभागाला यश – आमदार प्रताप अडसड

देशातील भौगोलिक परिस्थितीचे आव्हान असतांनाही ऊर्जा विभागाने देशभर वीजेचे जाळे विणले आहे. त्यामुळे 2018 मध्ये 100 टक्के गावांचे विद्युतीकरण आणि 100 टक्के घरांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात ऊर्जा विभागाला यश आले आहे. तसेच मेळघाटातील अती दुर्गम भागातील सात गावांचे विद्युतीकरणही उर्जा विभागाने केले असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले.

‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ हा कार्यक्रम आजादी का अमृत महोत्सवाचा भाग आहे. ऊर्जा क्षेत्रात मागील आठ वर्षात झालेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ऊर्जेच्या बाबतीत तुट असलेला भारत देश आता ऊर्जा पुरवठा करणारा झाला आहे. जिल्ह्यात अतिदुर्गम असलेल्या मेळघाटातील 7 आदिवासी पाड्याचे ऊर्जीकरण करणे ही महावितरणची उल्लेखनीय कामगिरी आहे. या शिवाय 21 कोटींचा निधी हा पारंपरिक पध्दतीने ऊर्जीकरण न झालेल्या 24 गावांसाठी राखून ठेवण्यात आला आहे.

मेळघाटातील ऊर्जा विकासासाठी धारणीत 132 केव्हीचे उपकेंद्र उभारण्यात आले आहे. त्यासाठी मध्यप्रदेश नेपानगर मधून वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच हिवरखेड ते धारणी असा 90 किमी लांबीचे डबल सर्कीट अती दुर्गम भागातून टाकण्यात आले असल्याची माहिती महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिली.

वीज क्षेत्राची यशोगाथा असलेल्या चित्रफिती यावेळी दाखविण्यात आल्या. तसेच नुक्कड नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा विकासाबाबत माहिती देण्यात आली. जिल्हास्तरावर विविध योजनेतून पूर्ण झालेल्या कामांची माहिती असलेल्या पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. लाभार्थ्यांनी यावेळी मनोगतही व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी केले. संचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांनी तर मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: