महापुराचा रुग्णालयाला फटका…१० कोविड रुग्णांचा मृत्यू…

चिपळूण फोटो

न्यूज डेस्क – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं थैमान घातले आहे. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये राज्यात 121 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये गुरुवारी आलेल्या महापुरामुळे येथील दोन कोविड केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या दुर्दैवी घटनेतील ८ जण अपरांत हॉस्पिटलमध्ये, तर २ जण अन्य एका कोविड केंद्रामध्ये उपचार घेत होते. या केंद्रांमधील प्राणवायू पुरवठ्यासह सर्व प्रकारच्या वैद्यकीय यंत्रणेमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चिपळूणमध्ये गुरुवारी पहाटेपासून पुराच्या पाण्याची पातळी वाढत गेली. दुपारपर्यंत या केंद्रांना पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी काहीजणांना बाहेर काढणेही अशक्य झाले. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू ओढवला, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

येत्या तीन दिवसांत  ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आणि पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील प्रामुख्याने घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २७ जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळेल. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांतील घाट विभागांमध्ये शनिवारी, २४ जुलैला अतिवृष्टीचा इशारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here