राहुल मेस्त्री
कर्नाटकातील बेळगाव महापालिकेसमोर लाल पिवळा झेंडा फडकवल्याने याच्या विरोधात आज 21 जानेवारी रोजी बेळगाव मध्ये मराठीभाषी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरांमध्ये मोर्चाचे नियोजन केले होते. या मोर्चाला महाराष्ट्रातील बहुतांश शिवसैनिक येणार असल्याची माहिती समोर आली होती.
या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी तालुका निपाणी येथील दूधगंगा नदी काठी कर्नाटक व महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर कडक बंदोबस्त ठेऊन महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 24 डिसेंबर रोजी बेळगाव महापालिकेसमोर कन्नड भाषिकांनी बेकायदेशीर पणे लाल पिवळा झेंडा फडकवला होता याला विरोध करत बेळगाव मधील मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले होते.
यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी बेळगाव जिल्हाधिकारी यांनी चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. पण पोलीस प्रशासनाशी चर्चा होईपर्यंत बेळगाव मधील मोर्चा काढू नये असा दबाव टाकण्यात आला होता. जरी मोर्चाला स्थगिती आली असली तरी महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिक बेळगाव मध्ये येण्याची गोपनीय माहिती बेळगाव जिल्हा प्रशासनाला मिळाल्याने कर्नाटक पोलिसांनी निपाणी पोलीस अंतर्गत दूधगंगा नदी काठी कर्नाटक सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

त्या बंदोबस्तामध्ये ग्रामीण उपनिरीक्षक बी एस तळवार, एएसआय टोलगी, कॉन्स्टेबल अमर चंदनशिव यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी उपस्थित आहेत. सदर बंदोबस्ताला चिक्कोडी पोलीस उपाधीक्षक मनोज कुमार नाईक यांनी भेट देऊन बंदोबस्ताची पहाणी केली…