कोडणी येथील ३७ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू…

राहुल मेस्त्री

कोडणी तालुका निपाणी येथील 37 वर्षीय युवक शिवाजी घरमुडे यांचा विद्युत मोटर सुरू करत असताना विजेच्या धक्क्याने दिनांक 20 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शिवाजी तुकाराम घरमुडे हा तरुण गेल्या अनेक वर्षापासून मुंबई येथील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वीच तो आपल्या गावी कोडणी तालुका निपाणी येथे आला होता. व येथील नाजूक नगर या परिसरात त्यांच्या नवीन वास्तूचे बांधकाम सुरू होते.

या बांधकामाला शनिवारी दिनांक 20 रोजी सकाळी आठ वाजले असता विद्युत मोटरच्या सहाय्याने बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेला असता विद्युत मोटारची पीन घालत असताना त्यांना विजेचा जबर झटका बसल्याने जागीच मृत्युमुखी पडले. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांना समजतात आक्रोश व्यक्त होत होता. सदर घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात केल्यानंतर मृत व्यक्तीचे शवविच्छेदन निपाणीतील शासकीय गांधी इस्पितळात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मृत शिवाजी यांच्या पश्चात आई वडील, पत्नी ,दोन मुली ,एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या या अचानकपणे झालेल्या दुर्दैवी मृत्यू मुळे कुटुंबात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी मुंबई येथे नामवंत कंपनीत नोकरी मिळवून आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती केली होती.एक गरीब व होतकरू युवक म्हणून कोडणी गावात त्यांची ओळख होती. दोन दिवसातच ते पुन्हा कामावर रुजू होणार होते .मात्र नियतीला हे मान्य नसावे की काय असे म्हणावे लागेल.. आणि नवीन वास्तू निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here