वरई पारगाव रस्त्यावर खैर तस्कर मोकाट…गस्ती पथक दोन महिने वाहनाविना…

दहिसर वन परिक्षेत्रात आठवडा भरात सहा खैरांच्या झाडांची कत्तल…

मनोर, ता.07
वनविभागाच्या दहिसर तर्फे मनोर वनपरिक्षेत्र हद्दीत खैर तस्करांनी धुमाकूळ घातला असून आठवडा भरात सहा खैराच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.सोमवारी (ता.07)पहाटे वरई पारगाव रस्त्यावरील गुंदावे गावच्या हद्दीत खैर तस्करांनी तीन झाडांची कत्तल केली असून गेल्या आठवड्यात वरई पारगाव रस्त्यावरील गुंदावे आणि दहिसर गावच्या हद्दी दरम्यान रस्त्यालगतच्या तीन झाडांची कत्तल केली होती.

दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीत वन विभागाच्या गस्ती पथकाकडे दोन महिन्यांपासून वाहन नसल्याने गस्ती पथकातील कर्मचाऱ्यांना गस्त घालण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे खैर तस्करांचे फावले असून खैराची कत्तल आणि तस्करीत वाढ झाली आहे.

वनविभागाच्या दहिसर तर्फे मनोर वनपरिक्षेत्र हद्दीतील वरई पारगाव रस्त्यावर गुंदावे ते दहिसर गावच्या हद्दीत रस्त्यालगत खैराच्या झाडांची संख्या मुबलक प्रमाणात आहे.मौल्यवान खैराच्या झाडांच्या संरक्षणासाठी वनविभागाकडून वरई पारगाव रस्त्यावर गस्त घातली जाते.रात्रीच्या वेळी गस्ती पथकातील कर्मचारी जंगलात खैर तस्करांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेऊन खैर तस्करीवर लगाम घातली जाते.

वन विभागाच्या दहिसर वन परिक्षेत्र हद्दीत गस्त पथकाचे वाहन दोन महिन्यांपासून नादुरुस्त झाले आहे. वाहन नसल्याने गस्ती पथकातील कर्मचाऱ्यांना मोटर सायकल द्वारे गस्त घालावी लागते आहे. त्यामुळे गस्ती पथकाच्या कर्मचाऱ्यांना मर्यादा येत आहेत.

सोमवारी पहाटे वरई पारगाव रस्त्यालगत खैर तस्करांनी खैराच्या तीन झाडांची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या आठवड्यातही खैर तस्करांनी तीन खैरांची कत्तल केली होती.दरम्यान कत्तल केलेल्या झाडांची खोडं दिसू नये यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी झाडाच्या फांद्या टाकून झाकून ठेवले होते. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

वरई पारगाव रस्त्यावर गस्ती पथकाकडे वाहन नसल्याने मौल्यवान खैर प्रजातीच्या झाडाची कत्तल वाढली आहे. त्यामुळे खैराची झाडे असलेल्या वरई पारगाव रस्त्यावर गस्त वाढवून कत्तल आणि तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून केली जात आहे.

गस्त पथकाचे वाहन नादुरुस्त झालेले वाहन दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे.परंतु वरई पालघर रस्त्यावर गस्त सुरूच आहे. लवकरच दुसरे वाहन घेऊन गस्तीचे काम सुरू करण्यात येईल.कत्तल केलेला काही माल जप्त करण्यात आला आहे.
नम्रता हिरे,वन परिक्षेत्र अधिकारी, दहिसर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here