२९ जुलै जागतिक व्याघ्र दिवस २०२१ विशेष…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

वाघ हा वन आणि वन्यजीवांच्या संपन्नतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. पुराणात देखील वन आणि वन्यजीवांचे महत्त्व विविध उदाहरणावरून स्पष्ट केलेले आहे . हिंदू धर्मातील विविध देवतांच्या वाहनांच्या रुपात वन्यप्राणी जोडलेले पाहायला मिळतात. दुर्गेचे वाहन सिंह अथवा वाघ आहे, भगवान श्रीविष्णू चे वाहन गरुड आहे तर भगवान शंकराच्या गळ्यात आपल्याला नागदेवता दिसते, कार्तिकेय चे वाहन मोर आहे.

गणपती आणि हनुमान ही तर हत्ती आणि मर्कटाचीच रूपे आहेत. ब्रह्मदेव हे नेहमी कमळाच्या फुलात विराजमान झालेले दिसतात. हे सर्व प्राणी, पक्षी आणि वनस्पती या आताच्या वन्यजीव संवर्धन अधिनियमानुसार सूची 1 किंवा 2 मधील आहेत ज्यांना कायद्याअंतर्गत सर्वाधिक संरक्षण प्राप्त आहे. अश्याच प्रकारे देवराई चे देखील उदाहरण देता येईल. आपल्या पूर्वजानी निसर्गातल्या अश्या महत्वाच्या वन्यजीवांना कोणत्या ना कोणत्या देव – देवतांशी जोडलेले आहे जेणेकरून भारतीय समाजमन श्रद्धेच्या हेतूने तरी वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करील.

त्याचीच प्रचिती आज येते की जगातील सर्वाधिक वाघ आज भारतात आढळतात. आणि भारत हा वाघांचा शाश्वत अधिवास म्हणून सिद्ध झाला आह. वाघांच्या संवर्धन आणि संरक्षणामुळे संपूर्ण वन्यजीवन आणि वनक्षेत्रातील परिसंस्थेचे संरक्षण होत असते म्हणूनच वाघांचे संरक्षण करणे म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण करणे होय, मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठीही व्याघ्र संवर्धन अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे.

परिसंस्थेचे परस्परावलंबन आणि वाघांचे महत्व
वाघ वन्यजीवन आणि वनक्षेत्रातील परिसंस्थेमध्ये अन्न साखळीच्या सर्वोच्च स्थानी असलेला मांसाहारी प्राणी असून , अन्न साखळीच्या शिखरावर आहे . परिसंस्थेतून जर सर्वोच्च मांसाहारी प्राणी नाहीसा झाला तर समूहातील शाकाहारी प्रजातींच्या सापेक्ष विपुलतेवर व्यापक परिणाम होऊन निसर्गाचा समतोल ढासळतो पर्यायाने मानवी जीवनदेखील संकटात येते . याचाच आधार म्हणून महाभारतातील उद्योगपर्वात वाघांचे आणि जंगलांचे महत्त्व पटवून देणारा श्लोक आपल्याला दिसतो :
। न स्याद् वनमृते व्याघ्रान् व्याघ्रा न स्युर्ऋते वनम् ।।
।। वनं हि रक्षते व्याघ्रर्व्याघ्रान् रक्षति काननम् ।।
या श्लोकाच्या आधारे महात्मा विदुर सम्राट धृतराष्ट्र याना वनांचे आणि वाघांचे परस्परावलंबीत्व सांगत आहेत. यात ते म्हणतात की वाघांशिवाय वनांचे अस्तित्व संभव नाही .तसेच वनांशिवाय वाघ जिवंत राहू शकत नाहीत. जंगलाचे संरक्षण वाघ करत असतो आणि त्याबदल्यात जंगले ही वाघाचे रक्षण करीत असतात. वाघांसह सिंह, बिबट्या, रानकुत्रे, लांडगा, कोल्हा इत्यादी मांसाहारी प्राणी आपल्या उपजीविकेसाठी तृणभक्षी शाकाहारी प्राण्यांचे भक्षण करतात; म्हणून त्यांना मांसाहारी किंवा मांस भक्षक प्राणी म्हणतात; त्यामुळे सृष्टीचक्रात संतुलन आणि नियंत्रण राखण्याची प्रक्रिया स्वाभाविकपणे आणि सातत्याने सुरु असते.

किंबहुना अन्न साखळीच्या अस्तित्वासाठी आणि समन्वयासाठी संपूर्ण सजीवसृष्टी आणि निसर्गसृष्टी परस्परावर अवलंबून असते ; कारण वाघ आणि अन्य मांसाहारी वन्यजीव त्याच्या अस्तित्वासाठी किंवा उपजीविकेसाठी इतर तृणभक्षी किंवा शाकाहारी प्राण्यावर अवलंबून असतात तर हरीण , ससे , गवे , रानम्हशी इत्यादी तृणभक्षी प्राणी हरित वनस्पती गवत,

औषधी वनस्पती, झुडुपे , एकपेशीय वनस्पती , बुरशी आणि झाडे इ . वर अवलंबून असतात आणि वनस्पतींच्या अतिरिक्त वाढीवर संतुलन आणि समतोल राखतात, त्याचप्रमाणे पक्ष्यांचे जीवन वनौषधी , झुडुपे , फळे , फुले आणि फळांचा रस , कीटके आणि झाडे यांच्यावर अवलंबून असते; तसेच ते बीज प्रसारणाच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका निभावतात , अशा प्रकारे वाघ आणि संपूर्ण सजीव सृष्टी एकमेकांशी जोडलेले असतात : म्हणूनच वाघांचे महत्व अनन्यसाधारण आहे.

परंतु अन्न साखळीत एवढे महत्वपूर्ण स्थान असूनही वाघ जगात अनेक ठिकाणाहून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत . वाघाचे अधिवास आणि अस्तित्व अनेक देशामध्ये नष्ट होत आहेत , ही खूप मोठी शोकांतिका आहे . या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आता वाघांच्या संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न सुरु आहेत.

व्याघ्र संवर्धनात भारताचे योगदान

वाघांच्या संवर्धनाचा सर्वंकष विचार करण्याच्या अनुषंगाने वाघाचे अस्तित्व असणाऱ्या देशांच्या सरकार – प्रमुखांनी सेंट पिट्सबर्ग , रशिया येथे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते . या सर्व राष्ट्र प्रमुखांनी मान्यता दिलेल्या जाहीरनाम्यानुसार जगभरातील वाघांची संख्या 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते . या बैठकी दरम्यान 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचेही ठरवले होते . त्यानुसार जगभरात व्याघ्र संवर्धनासंबंधी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो . जागतिक व्याघ्र दिन 29 जुलै 2019 हा भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस होता . याचदिवशी पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे व्याघ्र संवर्धनाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांनी देशभरातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट भारताकडून चार वर्ष आधीच गाठले गेले . भारतातील वाघांची संख्या आता 2967 झाली असून ती जगभरातील व्याघ्र संख्येच्या 70 टक्के एवढी आहे.

भारतातील वन्यजीवांचे कॅमेरा ट्रॅप मार्फत करण्यात आलेले सर्वेक्षण जगभरातील सर्वात मोठे व्यापक सर्वेक्षण असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी 2019 मध्ये भारतातील वाघांच्या सद्यस्थितीबद्दल उत्साह वर्धक अहवाल मांडला होताच , त्यानंतर ह्याच सर्वेक्षणाच्या आधारावर अधिक सखोल आणि व्यापक सर्वेक्षण देशपातळीवर करण्यात आले आणि अतिशय सर्वकष असा अहवाल भारताच्या वनमंत्र्यांनी 28 जुलै 2020 रोजी देशासमोर सादर केला ; हा अहवाल अतिशय विस्तृत आणि उत्साहवर्धक असा आहे . गेल्या तीन सर्वेक्षणात ( 2006 , 2010 , आणि 2014 ) मिळालेल्या माहितीची तुलना 2018-19 च्या सर्वेक्षणाशी करत , भारतातील वाघांची अंदाजित संख्या केंद्रीय वनमंत्र्यांनी याअहवालात सादर केली आहे.

याशिवाय या अहवालात उपलब्ध असणाऱ्या वनांची संख्या , एखाद्या ठिकाणी एकत्रितपणे आढळणाऱ्या वाघांची संख्या तसेच त्यांचे अस्तित्व नाहीसे होण्याचा दर या सगळ्यांची तुलना करत , वाघांच्या अधिवासाची दर शंभर किलोमीटरमागे बदलणारी स्थिती आणि त्याला जबाबदार असणारे घटक याची माहितीही सादर करण्यात आली आहे विशेष म्हणजे याअहवालात , वाघांचे अधिवास जोडणाऱ्या मार्गिका ( corridor ) किंवा संचार मार्गांचे पृथक्करणही करण्यात आले आहे ; वेगवेगळ्या अधिवासातील मार्गिकांमध्ये आढळणारे वेगवेगळे धोकादायक क्षेत्र आणि त्याठिकाणी व्याघ्रसंरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीही अधोरेखित करण्यात आल्या आहेत , वाघ आणि इतर वन्यजीव यांची माहितीही या अहवालात नमूद करण्यात आली असून देशभरातील त्याच्या संख्येची घनता आणि विपुलता यासंबंधीची सविस्तर माहिती सदर अहवालात आढळून येते . भारतीय वन्यजीव संस्था , डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशात दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना करण्यात येते.

देशात सर्वप्रथमव्यापक स्वरुपात व्याघ्र गणना 2006 मध्ये करण्यात आली होती ; व्याघ्रगणनेनुसार 2006 मध्ये देशात 1411 वाघ होते . 2010 मध्ये दुसरी गणना झाली तेव्हा 1706 , 2014 मध्ये तिसरी गणना झाली तेव्हा देशात 2226 वाघ होते . वाघांच्या या संख्येत वाढ होऊन आता देशात 2967 वाघ झाले आहेत. देशात वाघांच्या संख्येत मध्यप्रदेशचा अव्वल क्रमांक आहे . येथील वाघांची संख्या 2014 च्या व्याघ्रगणनेत 308 होती , ती आता 2019 मध्ये 526 इतकी झाली आहे.

त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून तेथील वाघांची संख्या 406 वरुन 524 इतकी झाली आहे . व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला आहे. येथील वाघांची संख्या 340 वरुन 442 इतकी झाली आहे . महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील वाघांची संख्या 190 वरुन 312 इतकी झाली . पाचव्या स्थानावर तामिळनाडू राज्य असून येथील वाघांची संख्या 229 वरुन 264 झाली आहे .

महाराष्ट्र राज्यातील सद्यस्थिती

महाराष्ट्र राज्यात सध्या मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा – अंधारी आणि बोर असे 6 व्याघ्र प्रकल्प आहेत . महाराष्ट्रातही वाघांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे, महाराष्ट्रात 2006 मध्ये 103 वाघ होते. 2010 मध्ये ते वाढून 168 झाले. 2014 मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेत ही संख्या वाढून 190 झाली . मागील 4 वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे 65 टक्के वाढ होऊन आता ही संख्या 312 इतकी झाली आहे.

वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. वरील ६ व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे . व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील स्थानिकांचे वनावरिलअवलंबित्व कमी व्हावे , मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने डॉ. श्यामाप्रासाद मुखर्जी जन – वन विकास योजना शासनामार्फत राबविली जात आहे.

योजनेमध्ये समाविष्ट गावामध्ये जन – जल – जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवताना मानव- वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात यामध्ये स्थानिकाना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देताना पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहे . वाघ हा निसर्ग चक्रातिल सर्वात महत्वाचा घटक आहे , वाघ वाचला तरच जंगल आणि माणूस वाचणार आहे.

वाघ आणि पर्यायाने जंगलाच्या संवर्धनासाठी राज्याचा वन विभाग सर्वोतोपरी कार्य करितआहे मात्र दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, जंगलावरील अतिक्रमणे, चोरटी शिकार, अधिवासाचा – हास या कारणाने जंगलावरील ताण वाढत आहे , यातून मानव – वन्यजीव संघर्ष वाढतो , मनुष्य वस्तीत बिबट्या घुसल्याच्या वाढत्या घटना तुम्ही ऐकल्या असतीलच !!!! हा वाढता मानव – वन्यजीव संघर्ष आटोक्यात आणून शाश्वत निसर्ग आणि वन्यजीव संवर्धन आणि विकास करणे हे सध्या वन विभागासमोरील आव्हान आहे.

मंगेश मधुकर ताटे वन परिक्षेत्र अधिकारी, पूर्व पेंच व्याघ्र प्रकल्प पिपरीया,नागपूर ( महाराष्ट्र )

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here