जीवाची पर्वा न करता मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त हेमंत नगराळेनी २६/११च्या हल्ल्यात आरडीएक्सने भरलेली बॅग स्वत: नेली होती बाहेर… जाणून घ्या सविस्तर…

मनोहर निकम महाव्हाईस न्यूज ब्युरो

न्यूज डेस्क :- मुंबईचे नवनिर्वाचित पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महाराष्ट्रातील बरीच महत्त्वाची पदे भूषविली आहेत. खरेतर मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील रहिवासी असलेल्या हेमंत नगराळे यांनी प्राथमिक शिक्षण जि.प शाळेतून घेत दुर्गम भागातून पुढे येत अभियांत्रिकी व व्यवस्थापनाचे विद्यार्थी असलेले नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस आहे. नक्षल बहुल जिल्हा चंद्रपुरातच एएसपी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग होती.

त्यांनी सोलापुरात तैनात असताना १९९२ च्या दंगलीवर कुशलतेने नियंत्रण ठेवले.त्यांनी एसपी म्हणून रत्नागिरीतील एनरॉन -दाभोल प्रकरण हाताळले. प्रतिनियुक्तीवर त्यांनी सीबीआयमध्येही काम केले आहे.२६/११ च्या ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी आरडीएक्सची भरलेली बॅग जप्त केली व ती स्वत: सुरक्षित ठिकाणी नेली. नंतर हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीही मदत केली.

ते नवी मुंबईचेही पोलिस आयुक्त राहिले आहेत. जानेवारी २०२१ पासून ते महाराष्ट्र पोलिस महासंचालकांची अतिरिक्त जबाबदारी सांभाळत होते. गोल्फ आणि टेनिस खेळण्याची हौस असलेल्या नगराळे यांना राष्ट्रपती पदक, विशेष सेवा पदक आणि अंतर्गत सुरक्षा पदक देण्यात आले आहे. ते ज्युडो मधील ब्लॅक बेल्ट धारक आहेत. तसेच अखिल भारतीय पोलिस खेळात देखील त्यांनी अनेक पदके जिंकली आहेत.

विशेष म्हणजे मुंबईतील पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याविषयी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना या पदावरून हटविण्यात आले असून आता मुंबई पोलिस आयुक्त पदी राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळणारे हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here