‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणांच्या गजरात औरंगाबादेत झाले छत्रपतींचे आगमन..!

औरंगाबाद – ऋषिकेश सोनवणे

संपूर्ण औरंगाबादकरांचे लक्ष लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chattrapati Shivajai Maharaj) अश्वारुढ पुतळ्याचे रविवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी शहराचे हृदय असलेल्या क्रांती चौकात आगमन झाले.

रविवारी रात्री पुतळा येणार ही माहिती समजल्यानंतर शहरातील शेकडो शिवप्रेमींनी संध्याकाळपासूनच क्रांती चौकात जमण्यास सुरुवात केली होती. रात्री उघड्या ट्रकमधून पुतळा आणण्यात आला तेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अनेकांची आपल्या मोबाईल कॅमेरात हे दृश्य टिपण्यासाठी धडपड सुरू होती. तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अलौकिक असा आनंद दिसून आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शुक्रवारी पुण्यातून निघाला होता. मजल दरमजल मुक्काम करत तो औरंगाबादेत आणण्यात आला. पुतळा क्रांती चौकात ज्या चौथऱ्यावर बसविण्यात येणार आहे त्याची उभारणी पूर्ण झाली असली तरी सुशोभीकरणाचे काम मात्र अजूनही पूर्ण झालेली नाही.

त्यामुळे पुतळा चौथर्‍यावर बसवून आता पुढील कामे केली जाणार आहेत. २५ फूट उंच आणि तब्बल ८ टन वजन असलेला हा पुतळा रविवारी रात्री क्रांती चौकात पोहोचला. उघड्या ट्रकमधून पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या बंदोबस्तात पुतळा आणण्यात आला.

पुतळा बाबा पेट्रोल पंपाजवळ आल्याचे कळताच शिवप्रेमींनी तिकडे धाव घेत क्रांती चौकापर्यंत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत क्रांती चौकापर्यंत तो आणण्यात आला. या गगनभेदी घोषणांनी रात्री क्रांती चौकात चैतन्य आणले होते.

यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त होता. दोन क्रेनच्या साहाय्याने रात्री साडेबारा वाजता पुतळा ट्रकमधून खाली उतरवण्यात आला. यावेळी अभिजीत देशमुख, दत्ता भांगे, राजू शिंदे, सुरेंद्र कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. पुतळा पूर्णपणे झाकलेला असुन शिवजयंतीला औरंगाबादकरांना आपल्या राजाचे दर्शन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here