पाच सदस्यीय समितीने केले कारभाराचे पोस्टमार्टम.
आता कारवाईची प्रतीक्षा.
पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायत मध्ये 14 वित्त आयोग निधीत अपहार झाल्याच्या अनेक तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गावातील नागरिकांनी केल्या होत्या त्यातच नुकतीच एक तक्रार सचिन मुर्तडकर यांनी केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली असून चौकशीला सुरुवात झाली आहे असून या चौकशीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल. त्यामुळे आता कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पातूर तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायतीला मिळालेल्या 14 वित्त आयोग, जनसुविधा, दलित वस्ती सुधार योजना, सामान्य फंड,आदी विकासकामांच्या निधीमध्ये मोठा अपहार झाल्या बाबतची नुकतीच तक्रार सचिन मुर्तडकर यांनी केली होती.
विकास कामे फक्त कागदोपत्री दाखविण्यात आलेली असून या विकास कामांबाबत काही कागदपत्रे व रेकॉर्ड पूर्ण करण्यात आले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीवरून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पाच सदस्यीय समितीने आलेगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराचा व विकास कामांचा पोस्टमार्टम केला.
या चौकशीमध्ये तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कामांचे अंदाजपत्रके मोजमाप पुस्तक सीसी व्हाउचर कॅशबुक आदी महत्त्वाचे रेकॉर्ड ग्रामपंचायत कडे आढळून आले नसल्याने चौकशी समितीने संबंधित ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी केली. रेकॉर्ड उपलब्ध नसल्या बाबत संपूर्ण चौकशीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे सादर करण्यात येणार असून आता या अनागोंदी कारभाराबाबत कोणाकोणावर आणि काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अल्टिमेटम
आलेगाव ग्रामपंचायत मधील या मनमानी कारभाराबाबत शहानिशा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी ग्रामपंचायतला भेट देऊन चौकशी केली. सर्व बाबी समोर आल्यानंतर त्यांनी संबंधितांना 24 तासाचा अल्टिमेटम देऊन उद्यापर्यंत सर्व रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले.
तसेच ग्रामपंचायत मधील नमुना 8 चे रजिस्टर गहाळ प्रकरणी ताबडतोब पोलिसात तक्रार देण्याचे आदेश दिले. या गोष्टी उद्यापर्यंत झाल्या नाहीत तर या प्रकरणात एफआयआर दाखल करणार असल्याचे त्यांनी बजावले. त्यामुळे आता या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई होणार असल्याचे दिसून येते.
तक्रारीची दखल घेऊन अगदी तत्परतेने चौकशी करण्यात आली व कारवाईचा इशारा देण्यात आला. त्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.