इंदोर ठरले सलग पाचव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर, यावेळी दिले जाणार तीन पुरस्कार…

इंदोर – देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवलेल्या इंदोरने यावेळीही स्वच्छतेत नंबर-1चा मान पटकावला आहे. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात इंदोरला कचरामुक्त शहराचे स्टार रेटिंगही मिळाले आहे. याशिवाय इंदोर महानगरपालिकेला 12 कोटींचा सफाई मित्र सेफ्टी चॅलेंज पुरस्कारही मिळाला आहे. हा पुरस्कार पहिल्यांदाच सुरू करण्यात आला आहे. एकूणच इंदोर शहराला यावेळी तीन पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय सफाई मित्र इंदिराबाई आदिवाल यांचाही गौरव करण्यात आला.

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते स्वच्छ शहरांना प्रदान करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने सलग 5व्यांदा इंदोरला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी गुजरातमधील सुरत आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा यांना देशातील दुसरे आणि तिसरे स्वच्छ शहर बनल्याबद्दल गौरवले. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात यूपीच्या वाराणसीला सर्वात स्वच्छ गंगा शहराच्या श्रेणीत प्रथम स्थान मिळाले आहे.

इंदूरमध्ये स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार कार्यक्रम पाहण्यासाठी 10 ठिकाणी एलसीडी स्क्रीन लावण्यात आल्या. राजवाडा येथे सफाई मित्र मोठ्या संख्येने जमले. यावेळी मनपाचे अधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वांनी फटाक्यांची आतषबाजी करून केक कापून आनंद साजरा केला.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे स्वच्छता सर्वेक्षण-2021 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासह अनेक अधिकारी या समारंभात उपस्थित होते. कार्यक्रमात स्वच्छता सर्वेक्षणाबाबत बनवलेले चित्रपट व गाणी दाखविण्यात आली. मध्य प्रदेशला यावर्षी 35 पुरस्कार देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here