अखेर विवेक पंडितांनी व्यक्त केलेली भिती खरी ठरली, शासनाच्या अपयशामुळे गरिबी व उपासमारीने घेतला मायलेकीचा बळी…

आदिवासी कातकरी महिलेने गरीबी आणि उपासमारीला कंटाळून आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीचे जीवन संपवले व स्वत:ही आत्महत्या केली

”स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही आदिवासींची स्थिती बदलत नाही, उपासमारीने जीव जातो हे आपल्या सर्वांचे अपयश”-विवेक पंडित

जव्हार, २५ जून२०२०

जव्हार तालुक्यातील मन सुन्न करणारी घटना घडली आहे. आदिवासी कातकरी महिला मंगला दिलीप वाघ (३०) हिने गरीबी व उपासमारीला कंटाळून आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केला स्वत: आत्महत्या केल्याची माहिती आज स्थानिक पोलिसांनी पत्रकारांना दिली.

जव्हार तालुक्यातील मुख्य पोलीस निरिक्षक श्री. अप्पासाहेब लेनगारे यांनी वार्ताहरांना सांगितले की फिर्यादी व मयत महिलेचा पती दिलीप वाघ (३५) याने दिलेल्या माहिती नुसार मंगळवारी रात्री २३ तारखेला जवळच्या बोरीचा माळ येथील जंगलात जाऊन, आपल्या पत्नीने आपल्या तीन वर्षाच्या मुलीचा साडीने गळा आवळून खून केला व स्वत: ही मोहाच्या झाडाला त्याच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आपल्या मुलीला मारण्याचे व आत्महत्येचे मुख्य कारण गरीबी व उपसमारी असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व मृत पावलेल्या महिलेविरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला अाहे.

मृत महिलेचा पती दिलीप वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही उदरनिर्वाहासाठी मिळेल ती मजुरी करीत होतो तसेच कधीकधी तालुक्यातील वीटभट्ट्यांवरही कामाला जात होतो. मात्र पावसाळा सुरु झाला आणि विटभट्टीचे कामही बंद झाले. सद्या कोरोना प्रादुर्भावामुळे टाळेबंदीकाळात मजुरी मिळणेच बंद झाले होते. त्यामुळे उत्पन्नाचा कोणतेच साधन उरले नव्हते, बरेच दिवस कुटुंबाची उपासमार सुरु होती. त्यामुळे गरीबी व उपासमारीला कंटाळून माझ्या पत्नीने माझ्या मुलीचे प्राण घेतले व स्वत:चेही जीवन संपवले” असे तक्रारीत म्हटले आहे. “आम्हाला कोणाकडूनही कसलाच मदत मिळाली नाही” अशी खंत त्याने बोलून दाखवली.

बुधवारी पहाटे ग्रामस्थांना ही महिला झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळली आणि मुलगी बाजुलाच मृत अवस्थेत आढळल्याचे पोलिसांना कळवले. दोघांचे मृतदेह सरकारी रुग्णालयात शव परिक्षेसाठी (Post-Mortem) पाठविण्यात आले आणि नंतर तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदविला. याप्रकरणी जव्हार पोलिस तपास करीत आहेत.

राज्यातील आदिवासींसाठी असलेल्या योजनांच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी या मृत्यूबद्दल भाष्य करताना म्हटले की, “ज्या गोष्टींची आपल्याला सर्वांना भीती वाटत होती तीच आज घडली आहे”. ते पुढे म्हणाले की, “मी अनेक वेळा शासनाला पत्रव्यवहार, दुरध्वनी व इतर मार्गाने याबाबत सूचित करत होतो. आदिवासींच्या मूलभूत गरजा भागवायला सांगत होते. जर आपण त्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू देऊ शकले नाही तर हा गरीब व वंचित आदिवासी घटक एक दिवस “कोरोना”ने नव्हे तर “उपासमारीने” (Starvation) मरण पावतील.
आदिवासींच्या कल्याणासाठी लढणार्‍या श्रमजीवी संघटनेने सर्व प्रकारच्या उपाययोजना, निषेध, मोर्चे, धरणे, उपोषण व शासन दरबारी जाब विचारला, मान. न्यायालयाकडे दाद मागीतली होती पण शेवटी जे घडणार होते तेच घडले आहे. ते पुढे म्हणाले की या घटनेमुळे मी पूर्णपणे विचलित झालो आहे.” असे पंडित यांनी माध्यमांना सांगितले.

तसेच “स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही स्थिती बदलत नाही, हे आपल्या सर्वांचे अपयशआहे. दि. १७ मार्च रोजी शासनाला स्थानिक पातळी पासून राज्यपातळी पर्यंत याबाबीचे गांभीर्य कळावे यासाठी वेळोवेळी माहिती दिली. मान. मुख्यमंत्री व मान. राज्यपालांनाही कळवले. या काळात संघटनेने पुढाकार घेऊन ३ कोटी २५ लाख इतक्या रकमेचे, ४९ हजार कुटुंबांना अन्नधान्य पुरवण्याचे आपले कर्तव्य बजावले. असे असूनही धोरणकर्ते अद्याप हस्तिदंत मनोऱ्यात बसून असतील तर याचा अर्थ मी माझ्या कर्तव्यात कमी पडलो, मी सरकारकडून काम करुन घेऊ शकलो नाही म्हणून मला वाटते की मी दोषी आहे, इतर कोणी नाही.” अशा तीव्र शब्दात पंडितांनी खंत व्यक्त केली आहे.

याबाबत शासन काय निर्णय घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण पंडितांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली तर आदिवासी भागांत उपासमारीने मोठ्या प्रमाणावर लोकं दगावतील हे नाकारतां येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here