भुसावळ मध्ये दोन रेल्वे अधिकाऱ्यांना अडीच लाखांची लाच घेतांना CBI ने रंगेहाथ पकडले…

न्यूज डेस्क – रेल्वेतही किती मोठे भ्रष्ट्राचारी अधिकारी आहेत हे काल अनेकांना निदर्शनास आले असेल, भुसावळ डीआरएम कार्यालयातील मोठे मासे गळाला लागले आहेत मंडळ अभियंतासह एकाला दोन लाख 40 हजारांची लाच घेताना नागपूर सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. रेल्वे बांधकामाचं अडीच कोटीचं टेंडर मिळाल्यानंतरही वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली होती लाच.

सोमवारी डीआरएम कार्यालयात सीबीआयच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सीबीआयच्या पथकानं रात्री उशीरा संबंधित अधिकाऱ्यांच्या घराचीही झाडाझडती घेतली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

रेल्वेचे मंडळ अभियंता एम एल गुप्ता आणि कार्यालयीन अधीक्षक संजीव रडे असं अटक केलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. सीबीआयच्या पथकानं एम एल गुप्ता यांना 2 लाखांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली आहे. तर संजीव रडे यांनी 40 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. यानंतर रात्री उशीरापर्यंत सीबीआयच्या 18 जणांच्या पथकाकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली आहे. रेल्वे विभागातील मोठे मासे गळाला लागल्यानं रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून रेल्वेची कामं केली जातात. यासाठी एका कंपनीनं अडीच कोटींच्या बांधकामासाठी ई-निविदा भरली होती. या कंपनीचा निविदा दर कमी होता. त्यामुळे या कंपनीला वर्क ऑर्डर देणं अपेक्षित होतं. मात्र वर्क ऑर्डर देण्यासाठी मंडळ अभियंता एम एल गुप्ता यांनी चार लाख रुपयांची लाच मागितली होती. यातील 2 लाख रुपये वर्क ऑर्डर देण्यापूर्वी आणि 2 लाख रुपये बिलिंग झाल्यानंतर देण्याचं ठरलं होतं.

दुसरीकडे रेल्वेतील बांधकाम अभियांत्रिकी विभागाचे कार्यालयीन अधीक्षक संजीव रडे यांनी 2.25 टक्के रक्कम वेगळी मागितली होती. यामुळे संबंधित बांधकाम कंपनीच्या संचालकांनी सीबीआयकडे याची तक्रार केली होती. यानंतर नागपूर, पुणे आणि मुंबईतील सीबीआयच्या पथकानं संयुक्त कारवाई करत दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here