पालघर जिल्ह्यात २० सप्टेंबर पासून पल्स पोलिओ मोहिमेची अमलबजावणी…

जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांचे प्रतिपादन.

पालघर – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 20 सप्टेंबर पासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि वसई या तीन तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 1988 साली पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले होते. त्यानुसार राज्यात 1995 पासून दरवर्षी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.पालघरच्या ग्रामीण आणि वसई महानगरपालिका क्षेत्रातही लसीकरण मोहीम दरवर्षी राबविली जाते.

प्राथमिक लसीकरण,नियमित सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहीमे अंतर्गत शून्य ते पाच वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करण्याची त्रिसूत्री पालघर जिल्ह्यात नियमितपणे राबविले जाते. त्यानुसार येत्या 20 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेला देखील सर्व पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.पोलिओ बाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी,सरपंच,नगराध्यक्ष,नगरसेवक, पोलीस पाटील,जिल्हा परिषद सदस्य,ग्रामपंचायत सदस्य आदी लोकप्रतिनिधी यांनी मोहिमेचे उद्घाटन करावे असे विनंती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

कोरोना काळात लसीकरणा दरम्यान शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून लहान बालकांना लसीकरण केले जाणार आहे.बुथवर सॅनिटायझर, हात धुण्याची व्यवस्था लसीकरण करणाऱ्या कर्मचारी स्वयंसेवकांना मास्क आणि ग्लोव्हज घालणे, प्रत्येक लाभार्थ्याला लसीकरण केल्यानंतर हात सॅनिटाईज करणे,

येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर पाळणे, घर भेटीच्या वेळेस सॅनिटायझर मास्क व ग्लोव्ज सोबत घेऊन जाणे, लहान बालकांना स्पर्श न करता केवळ मातेच्या स्पर्शानेच बालकांना लस पाजणे या नियमांचे पालन करून लसीकरण करणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.

लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून लहान बालकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले जाते अशी माहिती यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद चव्हाण यांनी दिली.

लसीकरण केंद्रांवर 20 सप्टेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण मोहीम राबवली जाईल. त्यानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवसांच्या घरभेटी तून लसीकरणातून सुटलेल्या बालकांना लस देण्यात येईल.

या बैठकीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र केळकर,जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ.किशोर चव्हाण,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सागर पाटील आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनकर गावित उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here