जगासमोर देशाची प्रतिमा मलीन होऊ देऊ नका…अन्यथा पायउतार व्हा !

एका मुलीवर बलात्कार होतो. तिचा खून होतो. नातेवाईकांच्या अपरोक्ष पोलीस रात्रीच तिच्या मृतदेहावर अंत्यविधी उरकून टाकतात. दुसऱ्या दिवशी हाथरस गावाला छावणीचे रुप येते. पिडीत युवतीचे कुटुंब नजरकैद होते. त्यांचा बाह्य जगाशी संपर्क विच्छेदीत करून टाकला जातो. ही झाली एक बाजू !

दुसऱ्या बाजुला, पिडीत युवतीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला अडविल्या जाते. त्याची कॉलर पकडली जाते. त्याला धक्काबुक्की करून जमिनीवर पाडल्या जाते. सत्तेत नसलेल्या अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही अशीच वागणूक दिली जाते. माध्यम प्रतिनिधींनाही बकाल अवस्था झालेल्या, दूःखाच्या सागरात बुडालेल्या या कुटुंबाची सद्यस्थिती आणि कुटुंबियांचे गा-हाणे जगासमोर मांडण्याची परवानगी दिली जात नाही. आम्हाला वरून आदेश आहेत, असे संपूर्ण पोलीस प्रशासन सांगते.

ह्या दोन्ही बाजु अगदी जशाच्या तशा मांडणारा चित्रपटही अद्याप पडद्यावर आलेला नाही. म्हणजे कल्पनेच्या भराऱ्या मारणाऱ्या सिनेक्षेत्रातील दिग्गजांच्या कल्पनाशक्तीलाही मर्यादा पडल्याचे सिद्ध करणारा हा उत्तर प्रदेशातील प्रकार आहे तरी काय ? समाजमन बधीर करून टाकणाऱ्या या वास्तवाचा अन्वयार्थ लावायचा कसा ? ‘वरून’ म्हणजे आदेश कोठून आलाय ? वर तर फक्त गृहमंत्री अन् मुख्यमंत्री ! आणखी वर जायचा प्रयत्न केला, तर गृहमंत्री आणि पंतप्रधान !

एखाद्या देशातील हे चित्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या देशाची प्रतिमा मलीन करणारे नाही का ? ज्या देशाच्या सर्वोच्च सभागृहातील विरोधी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला अशी हिन दर्जाची वागणूक दिली जाते. घटनात्मक अधिकार नाकारला जातो, त्या देशाला ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही’, हे नामाभिधान मिरविण्याचा अधिकार उरतो का ? त्या देशाचे नेतृत्व जगासमोर स्वतःला मिरवू शकेल का ? ‘आम्ही महिलांना पुरूषांपेक्षा वरचा दर्जा देतो’, असे शिकागोत छातीठोकपणे सांगणाऱ्या विवेकानंदाच्या भारताचे आम्ही नेतृत्व करतो, असे सांगण्यास कुणाची जीभ धजावेल ?

सुरुवातीला मांडलेल्या दोन बाजु विचारात घ्यायला भाग पाडणारा हा प्रकार आमची संस्कृती विकृत करणारा आहे. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला अंतर्मुख होऊन आपली जबाबदारी ओळखून पाऊल टाकायला भाग पाडणारा आहे. लोकशाही आणि संस्कृतीचं मूल्य पायदळी तुडवून…देश बुडवून स्वतः कुणीही मोठा होऊ शकत नाही, हा इशारा देणारा आहे. त्यामुळे देशाच्या नेतृत्वाने हस्तक्षेप करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतमातेची प्रतिमा मलीन होण्यापासून वाचवावी आणि ते शक्य नसेल, तर सत्ताशकट हाकणे सोडून पायउतार व्हावे.

प्रा.अविनाश बेलाडकर, पत्रकार, मूर्तिजापूर, जि.अकोला

1 COMMENT

  1. सर अगदी बरोबर जगात सर्वात मोठी लोकशाही प्रदान देश म्हणून भारता कडे बघितले जाते त्या देशाच्या विरोधी पक्ष्याच्या नेत्याला पोलिसांन कडून धक्काबुक्की लोट पाट त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करीत असेल तर त्या सरकारला सतेत राहण्याचा अधिकार नाही
    सर आपन मांडलेले विचार देशवासियांना विचार करावयास लावणारा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here