राकेश दुर्गे,चंद्रपुर
चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा तस्करी, दारुतस्करी, वाळूतस्करी आणि इतर अवैध धंद्यांना ऊत आला आहे. यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय मिळत आहे. यातूनच वेगवेगळ्या ‘गँग्स’ तयार झाल्या. आपसी हेवेदावे आणि प्रतिस्पर्धेतुन यांच्यात वाद निर्माण होतात. आणि त्याचीच फलश्रुती मग खून आणि खुनी हल्ल्यात होते. मग कुणाला भरदिवसा गोळ्या झाडून मारलं जातंय तर कुठे त्यासाठीचा सुनियोजित कट रचला जातोय.
चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात अशा प्रकारे संघटित गुन्हेगारी आता हातपाय पसरू लागली आहे. यासोबतच इतर क्षुल्लक कारणावरून देखील थेट हत्या होऊ लागल्या आहेत. चंद्रपूरसाठी ही बाब अत्यंत चिंतनीय आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का असेल तर त्याचा गुन्हेगारांना धाक आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे.
असल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आता थारा नाही, त्यांना ठोकून काढू. असला प्रकार जिल्ह्यात खपवून घेतला जाणार नाही. याबाबतचे कडक आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहे असे त्यांनी सांगितले. याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांनी होणार आहे. मात्र, ह्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोर, कठोर आणि त्वरित होणे गरजेचे आहे. अन्यथा चंद्रपूर जिल्ह्याचा यूपी-बिहार होण्यास वेळ लागणार नाही.
थरकाप उडविणारी गंभीर गुन्ह्यांची सूची
8 ऑगस्ट : बल्लारपूर येथील कोळसा व्यापारी सुरज बहुरीया याची भरदिवसा भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ह्या हत्येला दारुतस्करी आणि कोळसा तस्करीचे कारण आहे. यात पाच आरोपींना अटक करण्यात आली. यातील काही आरोपी तर अवघ्या एकोणीस-वीस वर्षांचे आहे. हत्येच्या काही दिवसांपूर्वी आरोपी अमन अंदेवार याने व्हाट्सएप स्टेटसवर ‘जंगल जंगल ही रहेगा, मगर शेर बदल जायेगा’ अशी पोस्ट टाकली होती.
15 सप्टेंबर : माजरी येथे जागेच्या वादातून ग्रामपंचायत सदस्य अमित केवट आणि त्याच्या भावाने अजय यादव नामक व्यक्तीचा चाकू आणि तलवारीने खून केला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अजय यादवने काही दिवसांपूर्वी आरोपींच्या घरी घुसून महिला व मुलांना मारहाण केली होती. त्यानंतर हा कट रचल्या गेला.
चिमूर तालुक्यातील कवडशी येथे आरोपी रोशन मसराम याने बहिणीला त्रास देतो म्हणून आपला जावई दीपक नैताम याची पाण्यात बुडवून हत्या केली.
24 सप्टेंबर : चोरीची माहिती दिली म्हणून सुटून आलेला आरोपी सरफराज उर्फ शूटर शेख आणि त्याच्या साथीदारांनी करण केवट याच्या घरात घुसून हत्या केली. त्यानंतर त्याच दिवशी मयत केवटच्या नातेवाईकांनी हत्या करणारा शूटरचा नातेवाईक सुल्तान उर्फ साजिद अली याला संपविले.
चंद्रपूर शहराजवळील बोर्डा वायगावच्या रस्त्यावर एकाला मारून फेकण्यात आले. त्याला आरोपी राजू येरमे याने रात्री क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून संपविले.
27 सप्टेंबर : माजरी येथे मुलीचा शारीरिक छळ करतो म्हणून सासरा अमृतलाल केवट आणि त्याचा मुलगा विजय केवट यांनी आपला जावई संदीप साबळे याला आपल्याच गावात कुऱ्हाडीने मारून संपविले.
30 सप्टेंबर : काँग्रेसमध्ये सक्रिय असणारा व्यावसायिक मनोज अधिकारी याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत कोसारा येथील फ्लॅटमध्ये आढळून आला. त्याला कुऱ्हाड आणि इतर शस्त्रांनी वार करून संपविण्यात आले. या प्रकरणात आरोपी म्हणून अपक्ष नगरसेवक अजय सरकार, रवींद्रनाथ बैरागी यांना अटक केली तर सीमा दाभाडे आणि धनंजय देबनाथ हे फरार आहे. हा खून राजकीय वायूमनस्यातुन आहे की आर्थीक व्यवहारातुन की अनैतिक संबंध याला कारणीभूत आहेत हे कळायला अजून मार्ग नाही. हे प्रकरण वाटते तितकं सोपं नाही. अनेक दिवसांपासून हा कट शिजत होता. या प्रकरणात महिला आरोपी कडीचा मुद्दा आहे. तिला पकडल्यावरच बरेच रहस्य उलगडणार आहेत.
1 ऑक्टोबर : तुकुम परिसरातील दहा वर्षीय बालक वेदांत पाटील याला आईस्क्रीमचे आमिष दाखवून त्याचे अपहरण करण्यात आले. त्याला दुचाकीवर बसवून लोहारा येथील पुलावर नेऊन नीलिमा शेंडे नामक ही महिला त्याच्यावर चाकूने हल्ला करून संपवित होती. मुलाने आरडाओरडा केला. यावेळी चीचपल्लीकडे जाणारे दोन इसम रुस्तम पठाण आणि बाळू डंबारे यांनी आवाज ऐकला आणि त्यांनी वेदांतला वाचविले. तरी त्याच्या पोटाला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली. लोक धावून नसते आले तर वेदांतचा जीव वाचला नसता.