हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त…सरकारचा मोठा निर्णय

न्यूज डेस्क – राज्यात सध्या सुरु असलेल्या हिरेन मनसुख प्रकरणावरून मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर आज महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. ‘सरकारने मोठा निर्णय घेतला असून हेमंत नगराळे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होणार आहेत, तर परमवीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जवाबदारी देण्यात आली आहे. तसंच रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली आहे,’ असं ट्वीट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे असून येथील भद्रावती जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केलं. 1987 बॅचच्या महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्यावर आता मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here