महसूल विभागाकडून हालोली रेती बंदर उध्वस्त, मनोर मंडळ अधिकाऱ्यांची कारवाई…

जेसीबी मशीनच्या साहाय्याने वाळू साठवणूकीचे खड्डे उध्वस्त.

मनोर – सक्शन पंपाच्या साहाय्याने वैतरणा खाडी पात्रातील अनधिकृत वाळू उत्खनन करून साठवणूकीसाठी तयार करण्यात आलेले तात्पुरत्या स्वरूपातील खड्डे शुक्रवारी (ता.20) महसूल विभागाने केलेल्या कारवाईत उध्वस्त करण्यात आले. मनोर मंडळ अधिकारी क्षेत्रातील हालोली आणि बोट रेती बंदरावर ही कारवाई करण्यात आल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

महामार्गावरील हालोली आणि बोट गावच्या हद्दीत वैतरणा खाडी पात्रात सक्शन पंपाच्या साहाय्याने वाळूचे अनधिकृत उत्खनन होत असल्याच्या तक्रारी मनोर मंडळ अधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या.त्यानुसार मनोर मंडळ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अकरा वाजताच्या सुमारास हालोली रेती बंदरावर छापा टाकला.

यावेळी हालोली पाटील पाडा हद्दीतील वैतरणा खाडी किनारी असलेल्या रेती बंदरात उत्खनन केलेली वाळू साठवणूक करण्यासाठी गोणींचा वापर करून तयार केलेले खड्डे आढळुन आले.यावेळी आठ ते दहा वाळू साठवणूकीचे खड्डे जेसीबी मशीनच्या साहाय्याने उध्वस्त करण्यात आले.

महसूल विभागाकडून रेती बंदरावर झालेल्या कारवाईमुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून बंदरावरील कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.कारवाई वेळी हालोली गावच्या सरपंच समृद्धी सांबरे, मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे, तलाठी नितीन सुर्वे आणि पोलिस पाटील सुवर्णा सातवी उपस्थित होते.

हालोली रेती बंदरावर मानोरचे मंडळ अधिकारी कारवाई करणार असल्याची कुणकुण वाळू माफियांना आधीच लागल्याने बंदरातून सक्शन पंप आणि वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी बोटी गायब करण्यात आल्या होत्या.त्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांना रिकामे वाळू साठवणूकीचे खड्डे उध्वस्त करून माघारी परतावे लागले.

नावझे,साखरे,दहिसर आणि बहाडोली गावाच्या हद्दीतील वैतरणा खाडी पात्रात वाळू उत्खनन सुरू असून मोठ्या प्रमाणात खाडी किनारे पोखरले जात असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून पुढे येत आहेत. रात्रीच्या वेळी खाडी परिसरात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याचे समोर आले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी दहिसर तर्फे मनोरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नम्रता हिरे यांनी हालोली गावातून बेकायदेशीर पणे रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई करीत ट्रक जप्त केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here