गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळ्याचा गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात कार्यक्रम :- पृथ्वीराज पाटील यांची माहिती…

सांगली – ज्योती मोरे

सहकारतपस्वी खासदार स्व. गुलाबराव पाटील यांचा जन्मशताब्दी सोहळा गुरुवार, दि. १६ सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी साडेतीन वाजता मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

यावेळी गुलाबराव पाटील यांच्यावरील चित्रफितीचे अनावरण उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक – निंबाळकर हे भूषविणार आहेत, अशी माहिती जन्मशताब्दी समितीचे कार्यकारी सचिव श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज सांगली येथे दिली.
सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांचे सहकार क्षेत्रात खूप मोठे योगदान लाभले आहे.

राज्यसभेवर खासदार म्हणून तसेच महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार म्हणूनही त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण कामाचा जबरदस्त ठसा उमटवला. विविध क्षेत्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. आपल्या संसदीय कार्यकाळात तसेच राज्य सहकारी बँकेवर अध्यक्ष असताना सहकार क्षेत्रात त्यांनी अनेक लोकोपयोगी नवनवीन उपक्रम राबवले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी संघटनात्मक कौशल्य दाखवले.

विविध क्षेत्रात उच्च स्तरावर काम केलेल्या या थोर व्यक्तिमत्वाचे विचार आणि प्रेरणादायी कार्य नव्या पिढीसमोर यावे, या उद्देशाने गुलाबराव पाटील जन्मशताब्दी समितीने या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्यासाठी विधान भवन, मुंबईच्या वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संयोजन सहाय्य लाभले आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

पृथ्वीराज पाटील

या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. प्रवीण दरेकर, संसदीय कार्यमंत्री ना. अनिल परब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले हेही प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे निमंत्रक गुलाबराव पाटील जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील, कार्याध्यक्ष कृषी व सहकार राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, कार्यकारी समिती सदस्य सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई हे निमंत्रक आहेत.

ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत, खा. संजयकाका पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, विद्याधर अनास्कर, श्रीमती रजनी पाटील, अंकुश काकडे, जयराम देसाई, हिरामण सातकर हे समिती सदस्य आहेत.कोविड नियमांचे योग्य प्रकारे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here