नागेपल्लीत कामगंध सापळे व ट्रायकोकार्ड बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

मिलींद खोंड

नागेपल्ली-केवलरामजी हरडे कृषी महाविद्यालय ,चामोर्शी येथील सातव्या सत्रातील विद्यार्थिनी नेहा घोसरे व सुरभी सुनतकर यांनी कृषी महाविद्यालयातील कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक श्री.छबिल दुधबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित शेतकऱ्यांना ‘धान पिकावरील खोडकीड्याच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा व पिकावरील पतंग वर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड चा वापर ‘ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना सांगितले कि, विविध पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी सततच्या रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे निसर्गातील मित्र किडींची संख्या कमी कमी होत चालली आहे . तसेच रासायनिक कीडनाशकांचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.

म्हणूनच सेंद्रीय शेतीद्वारे कीडनियंत्रणासाठी विविध जैविक घटकांचा वापर करून किडींची संख्या कमी करणे, ही काळाची गरज आहे. शेतात कामगंध सापळे लावल्यामुळे खोडकिड्याचे नर पतंग सापळ्याकडे आकर्षित होत असल्यामुळे त्यांच्या प्रजनन क्रियेला आळा बसून शेतात किडींची संख्या कमी होते.

त्याचप्रमाणे ट्रायकोकार्ड लावल्यामुळे तेथून बाहेर पडणारी माशी आपली अंडी पिकांवरील इतर किडींच्या अंड्यात घालत असल्यामुळे त्यांची संख्या कमी होऊन ट्रायकोग्रामाची संख्या वाढत असल्यामुळे नैसर्गिक समतोल राखून कीड व्यवस्थापनास मदत होते.

त्याकरिता ट्रायकोग्रामाची सुमारे चाळीस हजार अंडी असलेले एक कार्ड(ट्रायकोकार्ड) एक एकरसाठी पुरेसे आहे . या कार्ड वर दिलेल्या खुणांनुसार त्याच्या पट्ट्या कापून पानांच्या खालील लावावित. अशाप्रकारे विद्यार्थिनींनी माहिती देऊन शेतकर्‍यांमध्ये जागृकता निर्माण केली . याप्रसंगी श्रीनिवास निकोडे व अन्य शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here