लस घेताय ? जरा सांभाळून! एकाच व्यक्तीला दिल्या दोन लस…

google

प्रणव हाडे – महाव्हॉईस न्युज

देशामधील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. अनेकांना कोरोना लसीचा दुसऱ्या डोससाठी स्लॉट मिळत नाहीये. असं असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यामध्ये करोना लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडली. या घटनेच्या माध्यमातून लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. येथे एका व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतराने कोरोनाच्या दोन लसी देण्यात आल्या आहेत. ही घटना रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर घडली आहे. या घटनेनंतर लसीकरण केंद्रामध्ये एकच गोंधळ उडाला.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार बुधवारी या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या एकाच व्यक्तीला लसीचे दोन डोस पाच मिनिटांच्या अंतराने देण्यात आले. या व्यक्तीने ही घटना केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे घडल्याचा आरोप केलाय. लसीकरणासाठी मी गेलो, तेव्हा लस देणाऱ्या नर्स एकमेकींशी गप्पा मारत होत्या. त्या गप्पांमध्ये इतक्या व्यस्त झालेल्या की त्यांनी मला पाच मिनिटांमध्ये लसीचे दोन डोस दिले असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. लसींच्या दोन डोसमध्ये नक्की किती अंतर असावं यासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नव्हती अस या व्यक्तीचे म्हणणे आहे.

लस घेऊन घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने लसीकरण केंद्रावर घडलेला प्रकार कुटुंबातील व्यक्तींना सांगितला. त्यानंतर त्याला दोन डोस एकाच वेळी घ्यायचे नव्हते हे समजलं. यानंतर या व्यक्तीने मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि यासंदर्भात अधिकृतपणे तक्रार नोंदवली.

मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर या व्यक्तीला अपातकालीन वॉर्डमध्ये देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी नक्की काय घडलं, यासाठी जबाबदार कोण आहे यासंदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच घडलेल्या चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतल्याने काही नुकसान होत नाही, असं स्पष्ट केलं आहे. शासनाकडून जाहीर केलेल्या माहिती अनुसार लसींच्या दोन डोसमध्ये किमान चार आठवड्यांचं अंतर असणं बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here