मनोर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अनुपस्थित असल्याने उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.21) घेण्यात आलेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तांत्रिक कारणामुळे तहकूब करण्यात आली.या सभेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी एस के सालीमठ मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरंसींग द्वारे उपस्थित होते.
परंतु तांत्रीक कारणांमुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आवाज सभागृहात उपस्थित सदस्यांना येत नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून समाध्यक्षांनी सभा तहकूब केली, त्यामुळे अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वगळता सर्व सदस्य सभागृहात उपस्थित होते.इतर तीन सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सभेत जोडले गेले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी महत्वाच्या कामामुळे सभेला हजर राहू शकल्या नाहीत त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली होती.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यात गाजत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या,जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आदी विषयांवर वादळी चर्चा अपेक्षित होती.तीन महिन्याच्या कालावधीत होत असलेल्या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सभेसाठी अनुपस्थित राहिल्याने काही सदस्यांनी खाजगीत संताप व्यक्त केला.
सर्वसाधारण सभेत आपापल्या मतदारसंघातील महत्वाचे विषय उपस्थित करण्यासाठी सदस्यांनी जोरदार तयारी केली होती. जिल्हा परिषदेत शिवसेनेची सदस्य संख्या सर्वाधिक असून अध्यक्ष शिवसेनेचा आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांची प्रशासनावर प्रभाव नसल्याचे शिवसेनेचे सदस्य खासगीत व्यक्त केले आहे.
सर्वसाधारण सभेसाठी जिल्हा परिषद प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आवाज ऐकू येत नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून सभाध्यक्ष निलेश सांबरे यांनी सभा तहकूब केली.त्यामुळे अनेक सदस्यांचा हिरमोड झाल्याने नाराजी व्यक्त केली.