पोलिसांच्या घरांसाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार…

अकोला (जिमाका) – चांगले सुखकारक, पुरेशी जागा असणारे घरे उपलब्ध असणे हे पोलिसांची कामगिरी उंचावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पोलीस दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करुन देणे हे शासनाचे कर्तव्य असून पुरेशी जागा असणारी दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

अकोला येथील निमवाडी येथे बांधण्यात आलेल्या ३७८ सदनिकांचे (४२ अधिकाऱ्यांसाठी व ३३६ कर्मचाऱ्यांसाठी) सदनिकांचे तसेच पारपत्र कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  तसेच विधान परिषदेचे सदस्य आ. अमोल मिटकरी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस महासंचालक तथा पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळाचे संचालक विवेक फणसाळकर,

अमरावती परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा, हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. अकोला येथून या कार्यक्रमात  जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, महापौर अर्चनाताई मसने, विधान परिषद सदस्य ॲड किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल,  विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा,

आ. हरिष पिंपळे, आ. नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,  अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस गृहनिर्माणचे अधीक्षक अभियंता धनंजय चमलकर, विद्युत अभियंता अजय पाल तसेच अन्य अधिकारी  सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी ऑनलाईन पद्धतीने कोनशिला अनावरण केले.  त्यानंतर प्रातिनिधिक स्वरुपात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना  सदनिकांचे वितरण करण्यात आले. त्यात पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र मडावी, सहा. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, महिला पोलीस अंमलदार शारदा लोहेकर यांचा समावेश होता.

आपल्या संबोधनात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अकोल्यातील पोलिसांसाठी बांधण्यात आलेली ही घरकुले प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. मात्र कोरोनाच्या निर्बंध पाळणेही आवश्यक आहे. या घरांसोबतच पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होत असल्याने पश्चिम विदर्भातील लोकांना पासपोर्टसाठी नागपूरला जावे लागणार नाही.

चांगल्या व पुरेशा जागेची घरे मिळाल्याने कामावर असणारा ताण हा कमी होऊन सकारात्मक परिणाम होतो. अकोला पोलिसांनी कोरोना काळातही अत्यंत चांगली कामगिरी केली. या काळात पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन झाले.

पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करताना त्यांच्या कुटुंबियांनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी धन्यवाद दिले. पोलिसांनी आपले काम करताना आपली स्वतःची व आपल्या कुटुंबियांचीही काळजी घ्यावी,असे आवाहनही त्यांनी केले.  पोलिसांच्या घरांबाबत शासनाने ठरविल्यानुसार त्यांना दर्जेदार व पुरेशा जागेची घरे देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी सांगितले.

पोलिसांसाठी एक लाख निवासस्थानांचे उद्दिष्ट – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राज्यात पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी हे अधिक तणावात काम करत असतात. त्यांना सोयीची घरे उपलब्ध व्हावी यासाठी शासन कृतिशील आहे. पोलिसांचा उत्तम घरे उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल असा विश्वास व्यक्त करुन गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की,  येत्या काळात पोलिसांसाठी एक लाख घरे व ७५ नवे पोलीस स्टेशन बांधकाम करण्याचे उद्दिष्ट असून तसे नियोजन आहे.

पोलीस दलाने अकोल्यातील गुन्हेगारी दर कमी करण्यासाठी प्रयत्नशील असावे. कोणत्याही परिस्थितीत  असामाजिक तत्वांना आळा घालण्यासाठी अधिक दक्ष रहावे. पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधाही शासन  उपलब्ध करुन देत आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत  कायदा व सुव्यवस्थेशी तडजोड वा दिरंगाई सहन केली जाणार नाही, असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

पोलिसांमुळे राज्य सुरक्षित-गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील

महाराष्ट्र राज्य हे देशातील अग्रेसर असण्यामागे या राज्यातील कायदा सुव्यवस्था  उत्तम आहे हे एक महत्त्वाचे कारण आहे. देशाची सिमा सुरक्षित ठेवण्याचे काम सैनिक करतात तसेच राज्य सुरक्षित ठेवण्याचे काम पोलीस करतात. पोलिसांची सर्वतोपरी काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे,असे गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल-पालकमंत्री बच्चू कडू

पोलीस ताणतणावात काम करतात. त्यांना तणावमुक्त राहण्यासाठी उत्कृष्ट निवास सुविधा पुरविणे आवश्यक आहे. त्यांना अकोल्यात मिळालेल्या नव्या घरांमध्ये चांगली विश्रांती  व मानसिक स्वास्थ लाभो अशा शब्दात पालकमंत्री  ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. चांगल्या व आरामदायी घरांमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विवेक फळसाळकर यांनी केले तर जी. श्रीधर यांनी  या संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली तर मोनिका राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश गाडगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here