व्याघ्र संवर्धन प्रकल्पामध्ये फूट पेट्रोलिंग व देखरेख महत्‍वाची – श्री. भगवान…

एशियाटिक बिग कॅट सोसायटी व वनराई फाउंडेशनचा वेबिनार…

नागपूर – शरद नागदेवे

जेव्हा कुठल्याही क्षेत्राला ‘व्‍याघ्र प्रकल्‍प’ म्‍हणून चिन्हांकित केले जाते तेव्हा संवर्धनासाठी पहिले पाऊल हे अनावश्यक मानवी हस्तक्षेप टाळून वाघांचे रक्षण करणे हे असते. वाघ, वन्यजीव आणि शिकारीच्या हालचालींवर नजर ठेवणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी पायी गस्‍त घालणे ही सर्वात चांगली पद्धत असते. हा गस्‍त घालण्‍याचा प्रकार भारतात दुर्मिळ असून त्‍यावर भर दिला पाहिजे, असे मत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि वन्य तज्ज्ञ श्री भगवान यांनी व्‍यक्‍त केले.

एशियाटिक बिग कॅट सोसायटी आणि वनराई फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त ‘व्याघ्र प्रकल्पातील संवर्धन माहिती’ या विषयावर आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, अशावेळी हट पेट्रोलिंग यंत्रणा अडथळा निर्माण करू शकते त्‍यामुळे पायी गस्‍त घालण्‍याची प्रणाली प्राधान्‍याने पाळली पाहिजे.

सुनील लिमये, आयएफएस. पीसीसीएफ (वन्यजीव) म्‍हणाले, आपले अस्तित्व जंगलावर अवलंबून आहे म्हणून त्‍यांना त्यांच्‍या जागेवर राहू देणे हे आपले कर्तव्य आहे. जळाऊ लाकूड, तेंदूपत्ता वगैरे गोळा करण्यासाठी जाणारे लोक जेव्हा वन्‍यजीवांच्‍या अधिवासावर अतिक्रमण करतात तेव्हा वन्‍यजीवांच्‍या अस्तित्‍वावरचा तो हल्‍ला असतो.

आज व्याघ्रसंवर्धन दिनाचा एकमेव संदेश म्हणजे वाघांचे स्‍थान, त्‍यांचा अवकाश अबाधित ठेवणे होय. वनविभागाकडून नियमित जनजागृती करणे घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. वाघांच्या लोकसंख्येतील वाढीमुळे वन्यजीव अधिक सुरक्षित असल्याचे सुनिश्चित होते, असेही त्यांनी सांगितले.

नागपूर रेंजचे विशेष आयजी चिरंजीव प्रसाद म्हणाले, पोलीस विभाग आणि वनविभाग यांच्यात अधिक चांगल्या समन्वयासाठी वन्यजीव संवर्धनासंदर्भात संपूर्ण तपास आणि खटला चालविण्याच्या कार्याचे संस्थात्मकीकरण केले जावे.
वन्यजीव कायद्यांतर्गत झालेल्या शिक्षेमध्ये काही सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत जेणेकरून दोषीला अटक करणे, अशा प्रकरणांची दखल घेणे आणि खटला चालवणे यामधला वेळ वाचवणे शक्‍य होईल. गुन्हेगारांचा अयोग्य वावर रोखला जावा, असे ते म्हणाले.

वन्यजीव तज्ज्ञ डॉ. परमेश पंड्या यांनी सांगितले की, व्याघ्र प्रकल्पांच्या यशस्वीतेसाठी जंगलातील समुदायांचे पुनर्वसन करून त्यांचे सहकार्य घेणे अत्यंत आवश्यक आहे. या समुदायासाठी पर्यायी जीवनावश्‍यक सुविधा देण्‍यासाठी गृह अर्थशास्त्राचा अभ्यास केला गेला पाहिजे. अतिरिक्‍त डीजी (तुरूंग) सुनील रामानंद यांनीही आपले विचार मांडले.

व्याघ्र संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वनपाल आणि वनसंरक्षकांचा यावेळी सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वानराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ गिरीश गांधी होते. कार्यक्रमाचे संयोजन एशियाटिक बिग कॅट सोसायटीचे अजय पाटील यांनी प्रास्‍ताविक केले. आभार प्रदर्शन रोटरी क्लब आफ नागपूर ईलीट चे अध्यक्ष श्री शुभंकर पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here