नागपुरातील कोविड हॉस्पिटलला आग…चार रुग्णांचा मृत्यू

नागपूर – शहरातील वाडी येथील वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागल्याचं समोर आलं आहे. या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांनी पळापळ सुरू केली होती.

रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. मात्र, या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

रुग्णालयात एकूण 28 रुग्ण दाखल होते आणि त्यापैकी 10 रुग्ण हे आयसीयूमध्ये दाखल होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्यासोबतच रुग्णालयातील रुग्ण, कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्याचे काम सुरू केले.

वेल ट्रीट हे एकूण 30 बेडचं रुग्णालय आहे. 3 रुग्णांना सकाळी डिस्चार्ज देण्यात आला होता. उरलेल्या 27 रुग्णांना आता रुग्णवाहिकेतून दुसरीकडे उपचारासाठी नेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही आग रुग्णालयातील एसीला लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थली कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here