चिमुरातील घटनेच्या मदतीसाठी शेतकऱ्यांची नागभिडात पायपीट… डोक्याला जखम आणि पायाला पट्टी अशा प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये असंतोष…

चिमूर : चिमूर शहरालगत असलेल्या टेकाडीच्या शेतशिवारात वन्यप्राण्यांकडून मोठया प्रमाणात हैदोस घालून शेतपिकांचे नुकसान करण्यात येते. चिमूर तालुक्यातील या रिठी गावाचा समावेश नागभीड तालुक्यातील बाळापूर (तळोधी) वन कार्यालयात केला आहे. त्यामुळे नुकसानीचा मोबदला मिळविण्यासाठी चिमुरातील शेतकऱ्यांना नागभीड तालुक्यात हेलपाटे खावे लागत असल्याने असंतोष खदखदत आहे.

शासनाच्या या तुघलकी कारभाराला कंटाळून वडाळा येथील ज्ञानेश्वर शिरभय्ये यांनी चिमुरचे उपविभागीय अधिकारी यांना एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवेदन दिले. यात शेतकऱ्यांची या त्रासातुन सुटका करावी, अशी मागणी केली आहे. चिमूर तालुक्यात समाविष्ट असलेले टेकाडी हे सध्या रिठी गाव आहे.

त्याचा तलाठी साझा क्रमांक १२ आहे. हे रिठी जरी असले तरी, येथे शेती वाहिवाटीत असून शेतकरी वडाळा, चिमूर, कळमगाव तथा अन्य गावात वास्तव्य करतात. शेतशिवार जंगलव्याप्त परिसराला लागून असल्याने वन्यप्राण्यांचा या शेतशिवारात वावर आहे. त्यामुळे वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात.

वन्यप्राण्यांनी नासाडी केलेल्या पिकांची नुकसान भरपाई वन विभागाकडून मिळते. मात्र, टेकाडी येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळविण्यासाठी एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यातील वनकार्यालयात पायपीट करावी लागत आहे. चिमूर नगरपालिका हद्दीच्या लगत असलेले टेकाडी रिठी असल्याने याकडे शासनाने गांभीर्याने घेतलेले नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चिमूर शहरालगत असलेल्या टेकाडीचा समावेश चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाअंतर्गत नसल्याने चिमुरपासून अगदी हाकेच्या अंतरावर झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेकऱ्यांना नागभीड तालुक्यातील बाळापूर (तळोधी) येथे सुमारे ३० किमीचा प्रवास करून जावे लागते.
बरं, शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा मोबदला एकदा बाळापूरच्या वन कार्यालयात गेल्याने मिळेल असे शेतकऱ्यांचे नशीब नाही. कित्येकदा वनाधिकाऱ्यांकडून कुठल्याना कुठल्या त्रूटी समोर करून अनेकदा प्रकरण मुद्दामच रेंगाळत ठेवण्यात येत असल्याचा प्रकारही शेतकऱ्यांसोबत घडलेला आहे.

त्यामुळे ‘घडाई पेक्षा मडाई’ जास्त या ग्रामीण उक्तीप्रमाणे शेतकरी कंटाळून नुकसान भरपाई सोडून देतात. अनेक शेतकरी बांधवांनी ससेहोलपटपणा स्वीकारून नुकसानभरपाई मिळेल या अपेक्षेने, प्रकरणांचा अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, अनेकांना अद्यापही नुकसान भारपाईचा मोबदला मिळाला नाही, हा आश्चर्याचा विषय आहे.

नुकसानीचा मोबदला मिळावा यासाठी शेतकरी मेटाकुटीस आला असून त्यांच्यात शासनाप्रती असंतोष खदखदत आहे. टेकाडी येथील शेतकऱ्यांना चिमूर वनकार्यालय सोयीचे होईल. त्यामुळे टेकाडी रिठीचा समावेश बाळापूर येथून काढून हाकेच्या अंतरावर अगदी १ किमी अंतरावरील चिमूर वनकार्यालयात समाविष्ट करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या टेकाडीचा समावेश बाळापूरला असल्याने ‘डोक्याला जखम आणि पायाला पट्टी’ असा काहीशा प्रकाराला येथील शेतकरी सामोरे जात आहे.

त्यामुळे शेतीचा समावेश चिमूर वन कार्यालयात आणि रिठ महसूल हे कळमगाव ऐवजी चिमूर नगर परिषदमध्ये समाविष्ठ करावे, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. यावेळी जगन्नाथ ठाकरे, अरुण सावसाकडे, रामचंद्र शेन्डे, राहुल भोयर, नारायण श्रीरामे, राहुल वाकूलकर, वासुदेव शेरकी यांच्यासह अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here