मुंडगाव येथिल शेतकरी सापडले करपा व्हायरसच्या तडाख्यात…ऊभा कांदा जळाला…मदतीची प्रतिक्षा.

संजय आठवले, आकोट

प्रचंड महागाईच्या असह्य झळा, डोक्यावर कर्जाचा पहाड आणि दैनंदीन वाढत्या गरजा अशा स्थितीत जगत असतानाच ऊधार ऊसणवारीवर मोठ्या आशेने पेरलेला कांदा नैसर्गिक आपदेने ऊभा जाळल्याचे दृष्य हतबलपणे पाहण्याची वेळ मुंडगाव ता. आकोट येथिल शेतक-यांवर आली आहे. ह्या अस्मानी संकटाने मेटाकुटीस आलेल्या ह्या शेतक-यानी शासनाकडे मदतीचा टाहो फोडला आहे.

मुंडगाव ता. आकोट येथिल शेतकरी घनशाम मधूकर येवतकार. एक हेक्टर जमीनीचे धनी. त्यावर सेवा सहकारी सोसायटीचे मोठे कर्ज घेतलेले. घरात चिल्यापिल्यांसह दहा माणसे. आजुबाजुस पसरलेला खारेपाणीपट्टा. त्याने सिंचनाची तोकडी व्यवस्था. ऊत्पन्न आणि खर्चाची तोंडमिळवणी करता करता खस्तावलेले शरीर. घरातील चिल्यापिल्यांच्या तोंडी दोन वेळचा घास घालता घालता नाकी नऊ आलेले. त्यातच कर्ज वसुलीसाठी सेवा सहकारी सोसायटीचा पठाणी ससेमिरा. हे कमी म्हणून कि काय खरिपाने दिलेला दगा. आता पूढील मदार रब्बीवर. त्यासाठी ऊधार ऊसणवारी करुन घनशाम येवतकार यानी शेतात कांदा पेरला.

त्यापोटी होणा-या ऊत्पन्नाचे हिशेब सुरु झाले. आणि अचानक निसर्ग कोपला. त्याने कांद्यावर डोळे वटारले. ऊभ्या कांद्यावर करपाचे तांडव सुरु झाले. त्याच्या निवारणासाठी पून्हा ऊधार ऊसणवारी. कृषी सेवा केंद्र चालकाची अजिजी. मोठ्या धाडसाने अन् मिनतवारीने किटकनाशक आणले. फवारले. पण करपा अधिक शक्तीमान ठरला. हां हां म्हणता ऊभा कांदा करपू लागला. जिवमोलाने चितारलेले हिरवे स्वप्न भंगू लागले. पोटात खड्डा पडला. प्रयत्नांची शिकस्त केली. पण अवघा कांदा करपलाच. आपल्या खिशातील सुरक्षित पैसा मातीत घालून असुरक्षित करणे म्हणजे शेती याचे पून्हा एकदा प्रत्यंतर आले. घनशाम भाऊंनी ऊधारीने ऊभ्या केलेल्या दिड लाखाचा चुराडा झाला. त्यानी करपलेल्या कांद्यात शेळ्या मेंढ्या घातल्या. आपल्या तोंडचा घास हिरावला असला तरी मूक्या प्राण्याला मात्र दोन घास खाऊ घालण्याचे आपले जगाच्या पोशिंद्याचे ब्रिद त्यानी स्वतःच्या मरणासन्न स्थितीतही राखले.

पोटाचे वर खाणे ही विकृती आहे. पोटभर खाणे ही प्रकृती आहे. आपल्या घासातील घास दुस-यास देणे ही संस्कृती आहे. पण आपल्या ताटात असलेला एकमेव घासही मूक्या प्राण्याना देणे ही जगाच्या पोशिंद्याची कृती आहे. ती घनशामभाऊनी केली.

अशीच काहीशी अवस्था याच गावातील विजय कडोने, दिपक राठी, संजय खोकले, कैलास थोटे, विनोद घाटोळ, भास्कर आकोते, प्रमोद गणोरकार, गजानन चिंचोळकर, शे. मन्सुर या शेतीपुत्रांची आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात करपाने कहर केल्याने शासनाने काही ऊपाय योजना करावी आणि येथिल संकटग्रस्त बळीराजांवर आत्महत्येची पाळी येवू नये म्हणून त्याना मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here