अकोला – अकोल्यात आज दुपारी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या निवासस्थानासमोर शेतकऱ्यांनी राखरांगोळी आंदोलन केले. यात संघटनेतर्फे केंद्र सरकारचा निर्यातबंदी आदेश जाळून निषेध व्यक्त केल्या गेला तर याबाबतचे निवेदन शेतकरी संघटनेतर्फे केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांना देण्यात आले..
मात्र, ते नसल्याने हे निवेदन त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. सहा महिने शेतकऱ्यांनी कांदा मातीमोल भावाने विकला. आता कुठे किमान खर्च भरून निघेल असा भाव मिळू लागला होता.
मात्र, केंद्र शासनाने अचानक निर्यातबंदी करून कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला. या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे नव्हे तर देशाचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, असे शेतकरी संघटनेने म्हटले आहे.शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचे काम लोकसभेत करायचे असते. परंतु, शेतकऱ्यांनी निवडून दिलेले खासदार आपले कर्तव्य विसरले आहेत.
त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी व कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची कल्पना देण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे निर्यातबंदी आदेश जाळण्यात आले. या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, सतीश देशमुख, विलास ताथोड, धनंजय मिश्रा, डॉ. निलेश पाटील, सुरेश जोगळे, लक्ष्मीकांत कौंटकार यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.