गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या !…पातूर तालुक्यात लॉकडाऊनचा दुसरा बळी…

पातूर तालुका प्रतिनिधी : संपूर्ण ताळेबंदीच्या कालावधीत समाजातील सर्वच वर्गाला आर्थिक फटका बसला आहे,पण ज्यांचे हातावर पोट आहे अश्या गोरगरीब वर्गाला मात्र ताळेबंदीची झळ मोठ्या प्रमाणात सोसावी लागत आहे.प्रशासनाचे नियोजन कुठतरी चुकल्यामुळे जगाचा पोशींदा असलेला बळीराजा मात्र संकटात सापडला असून लॉकडाऊनमूळे अगोदरच आर्थिक विवंचनेत असलेल्या बळीराजावर निसर्गदेखील कोपल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने मृत्यूचा मार्ग पत्करणे अधिक सोयस्कर वाटले.


पातूर तालुक्यातील देऊळगाव येथील गावालगतच्या शेतशिवारात गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आपले जीवन संपविल्याची घटना घडली आहे.आज दि .28-6-2020 रोजी सकाळी साडेसहा वाजतासाच्या सुमारास गावालगतच्या शेतशिवारातील झाडाला इसमाने फाशी घेतल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. सदर मृतकाचे नाव अशोक राघोजी उपर्वट (58) रा.देऊळगाव असे आहे.


मृतक अशोक उपर्वट यांनी गत वर्षापूर्वी दहा हजार रुपयांचे खाजगी कर्ज घेतले होते,घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढतच गेल्याने त्यांच्यासमोर कर्जाचा डोंगर उभा ठाकला. त्यातच नव्याने पेरणी केलेल्या जमिनीत पीक उगवलेच नसल्याने दुबार पेरणीचे संकट या शेतकऱ्यावर आले. अगोदरच कर्जाचा डोंगर व त्यातच दुबार पेरणीच्या खर्चापेक्षा अशोक उपर्वट यांना मृत्यू स्वस्त वाटल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.


पातूर तालुक्यात याअगोदर देखील कर्जाचे हप्ते न फेडू शकल्याने एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली,त्या घटनेची शाई वाळते ना वाळते तोच आज एकाच महिन्यातील लॉकडाऊनचा दुसरा बळी गेल्याची घटना घडली.

मृतकाच्या घरची आर्थिक परिस्थिती पाहता शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
सदर प्रकरणात पातूर पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आला असून पुढील कार्यवाही ठाणेदार गजानसिंग बायस यांच्या मार्गदर्शनात पातूर पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here