प्रसिद्ध नाट्य-सिने ज्येष्ठ अभिनेते श्री अविनाश खर्शीकर यांचं हृदय विकाराच्या झटक्याने आज सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी ठाणे येथे हे निधन झाले.त्यांना आज गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं असून त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाल्याचं पाहायला मिळालं. ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होतं.
त्यानंतर त्यांनी एकाहून एक सरस अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. यापैकी ‘जसा बाप तशी पोरं’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘लपवाछपवी’, ‘माफीचा साक्षीदार’ असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले.
विशेष म्हणजे केवळ रुपेरी पडदाच नव्हे तर रंगभूमीवरदेखील त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘वासूची सासू’, ‘अपराध मीच केला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘लफडा सदन’ ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली.
दरम्यान, अविनाश खर्शीकर यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेत ते झळकले होते. तुळस आली घरा, माहेरची पाहूणी आदि मालिकांतुन देखील ते दिसले होते.गेले काही काळ ते आजारी होते व ठाण्यातील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.