रिपब्लिक टीव्हीचा भाजपशी थेट संबंध असल्याने फडणविसांनी अन्वय नाईक प्रकरण दडपले…सचिन सावंत

मुंबई, ता. 13 नोव्हेंबर: भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिक टीव्हीचा थेट संबंध असून, त्यामुळेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दडपण्यात आले, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

नाईक आत्महत्येबाबत सावंत यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर सडकून टीका केली. एका मराठी व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणामध्ये त्याच्या कुटुंबाला न्याय दिला जात असताना भाजप व त्यांचे नेते वारंवार नाईक कुटुंबावरच संशय निर्माण करणारी विधाने करीत आहेत. नाईक कुटुंबातील महिला सदस्यांबाबत अतिशय हीन पातळीवर अपप्रचार केला जातो आहे. यामागे कोण आहे हे वेगळे सांगायची गरज राहिलेली नाही. भारतीय जनता पक्षाचे हे अश्लाघ्य प्रकार पाहता एका मराठी माणसाला न्याय देण्यासाठी सुरू असलेला हा लढा त्यांना पाहवत नाही का? असा संतप्त सवालही त्यांनी केला. 

भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिक टीव्हीच्या संबंधांवर बोलताना त्यांनी सांगितले की, या वृत्तवाहिनीचे प्रमुख प्रवर्तक असलेले राजीव चंद्रशेखर हे भाजपाचे खासदार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या इशाऱ्यावरच त्यांनी रिपब्लिक टीव्हीमध्ये आर्थिक भांडवल गुंतवले आहे, यात शंका नाही. भाजपशी लागेबांधे असल्यामुळेच फडणवीस सरकारने अन्वय नाईक प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळू दिला नाही. आजही हे प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. 

अन्वय नाईक यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेल्या ज्या आर्थिक व्यवहाराचा आत्महत्येशी संबंध नाही, अशा व्यवहारावरून आरोपांची राळ उठवून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या महाराष्ट्राची दिशाभूल करू पाहत आहेत. परंतु नाईक यांची आत्महत्या ज्या आर्थिक बुडवेगिरीमुळे झाली, त्याबाबत मात्र त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे. यातूनच यामागील भाजपचे  कटकारस्थान दिसून येते, असेही काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here