खळबळजनक | तलाठ्याला खमारीत धक्काबुक्की करून डांबले…पूरपरिस्थितीच्या हयगयीमुळे होणार निलंबनाची कारवाई !

भंडारा : गावात पूरपरिस्थिती असताना तलाठ्याने कर्तव्यात हायगय करून एका ग्रामस्थाला अश्लील शब्दात शिवीगाळ केली. यामुळे संतप्त ग्रामवाशीयांनी तलाठयाला धक्काबुक्की करीत ग्रामपंचायतमध्ये डांबले. हा प्रकार भंडारा तालुक्यातील खमारी (बुटी) येथे मंगळवारला दुपारी घडला.

भंडारा जिल्ह्यात महापुराने थैमान घातल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसला आहे. भंडारा तालुक्यातील खमारी (बुटी) येथील नागरिकांनाही या महापुराची झड बसली. त्यामुळे गावात न राहता भंडारा येथे राहून कर्तव्य बजावणाऱ्या तलाठी प्रवीण उमक यांना एका ग्रामस्थाने फोन करून पूरपरिस्थितीबाबत माहिती दिली. मात्र, सदर ग्रामस्थाला उर्मट स्वभावाच्या प्रवीण उमक या तलाठ्याने अश्लील शिवीगाळ करीत पाहून घेण्याची धमकी दिली. या संभाषणाचा ऑडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे.

आज मंगळवारला तलाठी प्रवीण उमक हे खमारी (बुटी) या गावात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन अहवाल तयार करण्याकरिता गेले होते. ग्रामपंचायत कार्यालयात उमक हे बसले असताना ज्या ग्रामस्थांशी वाद घालून अश्लील शिवीगाळ केली, त्या ग्रामस्थाने ग्रामपंचायत गाठत तलाठी उमक यांना जाब विचारला. यावेळी संतप्त ग्रामस्थ व तलाठी त्यांच्यात वाद झाला.

वादानंतर काही ग्रामस्थांनी तलाठी उमक यांना चांगलेच धारेवर धरत धक्काबुक्की करून ग्रामपंचायतमध्ये डांबून ठेवल्याचे समजते. घटनेनंतर भयभीत झालेल्या तलाठी उमक यांनी सदर घटनेची माहिती तहसीलदार अक्षय पोयाम आणि कारधा पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून भंडाराचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के हे तहसीलदार अक्षय पोयाम यांच्यासह खमारी येथे पोहोचले.

दरम्यान, कारधा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कराडे हे आपल्या पथकासह खमारी येथे दाखल झाले. संतप्त ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना, सदर तलाठी उमक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी लावून धरली. प्रकरण चिघळू नये म्हणून उपविभागीय अधिकारी यांनी ग्रामस्थांना तलाठी उमक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण शांत झाले.

प्रतिक्रिया
ग्रामस्थांनी तलाठी प्रवीण उमक यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत त्यांच्याविरोधात पूरपरिस्थितीबाबत हयगय केल्याचा आरोप लावला आहे. तहसीलदार अक्षय पोयाम यांना सर्व आरोपाची शहानिशा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तलाठी त्यात दोषी आढळल्यास त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करतील. तहसीलदार त्यांच्या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल.

  • संदीप भस्के,
    उपविभागीय अधिकारी, भंडारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here