खळबळजनक…संतप्त नातेवाईकांची जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण…ऑक्सीजन अभावी रुग्णाचा मृत्यू

प्रशांत देसाई
भंडारा

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना केंद्रात उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याशी वाद घालून मारहाण केली. ही घटना सोमवारला रात्री घडली. या मारहाण प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, भविष्यात असा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोविड केंद्रासमोर एक पोलीस छावणी सुरू केली आहे.

भंडारा जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबतच मृत्यूचाही आलेख वाढलेला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना केंद्रात मोठ्याप्रमाणात सुविधांचा अभाव असल्याची ओरड मागील काही दिवसांपासून सुरू आहे.

त्यामुळे येथील गलथान कारभाराच्या अनेक तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी स्वतः बीपीई किट परिधान करून कोरोना केंद्रातील सुविधांची पाहणी करून उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधला होता. मात्र, यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये दिवसागणिक असंतोष वाढत चाललेला आहे.

सोमवारला रात्रीच्या सुमारास या कोरोना केंद्रात उपचार घेणाऱ्या एका पॉझिटिव्ह रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. सिलेंडमधील ऑक्सिजन संपल्याची बाब लक्षात येतात कंत्राटी कर्मचारी ऑक्सिजनचे सिलेंडर बदलावीत होता. दरम्यान, आपल्या रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची गंभीर बाब या संतप्त नातेवाईकांना मिळाली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्ण दगावला,

असा रोष व्यक्त करीत संतप्त नातेवाईकांनी कंत्राटी कर्मचाऱ्याशी वाद घालून त्याला मारहाण केली. कोरोना केंद्रात सुरू झालेल्या या मारहाण आणि आरडाओरड ऐकून अन्य कर्मचारी धावून आल्याने सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांची तिथून सुटका केली.

दरम्यान, या घटनेने आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. असा अनुचित प्रकार भविष्यात घडू नये, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पोलीस विभागाला सुरक्षा मागितली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या विनंतीवरून कोरोना केंद्रासमोर पोलिसांची एक छावणी सुरू करण्यात आली आहे. या मारहाण प्रकरणाची पोलिसात कुणीही तक्रार दाखल केली नाही, हे विशेष.

दरम्यान, जिल्हा पशुसर्व चिकित्सालय भंडारा येथील परिचर यांचे आज कोरोनामुळे मृत्यू झाला.पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – २ दाभा येथील सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – १ मानेगाव येथील परिचर होम क्वारंटाईन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया….
संतप्त नातेवाईकांनी राडा केला. पोलीस तातडीने आल्याने कुणालाही मारहाण झालेली नाही. वास्तविकतेत मृत पावलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तो दगावला. रुग्णालयातील दोन फिजिशियन पॉझिटिव्ह असल्याने कामाचा बोजा वाढलेला आहे. भविष्यात असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून, कोरोना केंद्रासमोर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. यापुढे कोरोना केंद्रात केवळ पेशंट जाईल त्यांच्या कुठल्याही नातेवाईकांना जाण्यास बंदी घालण्यात येणार असून, त्यासाठी कोविड केंद्र परिसरात बॅरिकेट्स लावण्यात येणार आहे.

डॉ प्रमोद खंडाते
जिल्हा शल्य चिकित्सक
जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here