कोरोना संकटामध्ये देखील राज्याचा विकासाचा गाडा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार…

  • बीड येथील 100 कोटी 60 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात  प्रतिपादन
  • बीड जिल्ह्यात दर्जेदार कामे करून दाखवू, जिल्ह्याला अर्थमंत्री या नात्याने झुकते माप द्या – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड – राज्य सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीत आलेल्या कोरोना संकटामध्ये देखील राज्याचा विकासाचा गाडा थांबला नाही आणि थांबणार नाही याची काळजी घेतली गेली. निधीची चणचण असूनही आरोग्य, रुग्णालय आणि विकास कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. विकास कामांसाठी येणारा पैसा हा जनतेचा असून यामधून होणारी कामे दर्जेदारच असली पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बारकाईने काळजीपूर्वक लक्ष द्यावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले.

बीड येथे १०० कोटी ६० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते बीड येथे संपन्न झाले. उपमुख्यमंत्री श्री. पवार हे मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले.

दोन वर्षाच्या काळात कोरोना संकटाच्या काळात देखील राज्याने दिला जिल्ह्यात मोठा विकास निधी

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आग्रही मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजना, विकासाच्या अन्य योजना, आमदार निधी आदींमध्ये कोणतीही कपात केली नाही. बीड जिल्ह्याच्या विकासाचा विचार करता, डीपीडीसी मधून ३६० कोटी रुपयास नुकतीच मंजुरी दिली, ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ व त्यास २० कोटी भागभांडवल साठी तरतूद, वसतीग्रहासाठी निधीची तरतूद, नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा हिश्शाचा निम्मा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांत साठी विकास निधी आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मोदक मोठ्या प्रमाणात तरतूद असा विविध योजनातून विकास निधी दिला गेला आहे.

केंद्र सरकार सारखे राज्यांना नोटा छापायला अधिकार नसल्याने राज्याच्या उत्पन्नातून हा निधी दिला जातो. बीड शहरासाठी अमृत योजनेतून दोन पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यास पाण्याचे प्रश्न सुटू शकेल परंतु नगरपरिषदेचे वीज बिल थकीत आहे. आर्थिक शिस्त देखील लागण्याची गरज आहे यावर उपाय काढण्यासाठी प्रशासक आणि बीडचे आमदार यांना सूचना केली आहे.

कोरोना बरोबरच नैसर्गिक आपत्ती साठी निधी दिला गेला आहे. जगात काही ठिकाणी कोरोना साथीची चौथी लाट देखील आली आहे . त्यामुळे आपण गाफील न राहता लसीकरण केले जावे बूस्टर डोस व विद्यार्थ्यांचे लसीकरणा मध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय यंत्रणा व उपस्थितांना केले.

बीड जिल्ह्याला झुकते माप द्या – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्हा हा मागासलेला म्हणून ओळखला जातो, हे मागासलेपण दूर करण्यासाठी रखडलेल्या नगर बीड परळी रेल्वे मार्गासह, ऊसतोड कामगारांची आर्थिक उन्नती, शेतीला मुबलक पाणी, ग्रामीण भागातील दळण वळण अशी अनेक विधायक कामे पूर्ण करण्याचा राज्य सरकारच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. कोविड काळात राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा व विकासाला पूरक निधी उपलब्ध करुन दिला. आता जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात येत असलेल्या निधीतून दर्जेदार व राजकारण विरहित कामे करून दाखवू असे यावेळी बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

बीड जिल्हा पुणे जिल्ह्या प्रमाणे विकसित व्हावा हे आपले स्वप्न असून, यासाठी अर्थमंत्री या नात्याने आपण जिल्ह्याला निधी देताना ओंजळ मोठी करावी व जिल्ह्याला झुकते माप द्यावे, अशी विनंती पुढे बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली.यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मागील दोन वर्षात बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील कामकाज, कोविड व्यवस्थापन व जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकासकामांची संक्षिप्त माहिती दिली.

पंचायत समिती सारख्या वास्तूंना आवश्यक निधी देऊ, तिथे लोकाभिमुख कामे व्हावीत – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

बीड पंचायत समितीचे लोकार्पण हे कोरोना काळात केलेल्या पाठपुराव्याचा परिणाम आहे; या निमित्ताने बीडमध्ये विकास पर्व सुरू होत आहे. या वास्तूचा सामान्य लोकांच्या कामांसाठी पुरेपूर उपयोग केला जावा अशी अपेक्षा यावेळी बोलताना श्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी इमारतींच्या पूर्णत्वास आवश्यकतेप्रमाणे निधी देण्याचे आश्वासन यावेळी मंत्री श्री मुश्रीफ यांनी दिले.

200 खाटांमध्ये 170 आयसीयू बेड, 30 पेडियाट्रिक तर 125 पदांना मंजुरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, नवीन मंजुरी दिलेल्या 200 खाटांच्या रुग्णालयामध्ये 170 आय सी यू बेड व तीस पेडियाट्रिक आयसीयू बेड मंजूर करण्यात आले आहेत. तसेच यासाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नर्सेस व पॅरामेडिकल स्टाफ च्या 125 पदांना देखील मंजुरी देण्यात येत आहे. कोरोना परिस्थितीत राज्याच्या आरोग्य विभागाने मोठे काम केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात एक हजार ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यापैकी 65 ऍम्ब्युलन्स बीड जिल्ह्यात देण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात आता ऍम्ब्युलन्स उपलब्ध आहे.

भंडारा येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून फायर ऑडिट करण्यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात लसीकरणाची आकडेवारी वाढावी तसेच दिव्यांग अस्मिता – नोंदणी व युडीआयडी कार्ड अभियानास सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहनही श्री टोपे यांनी केले.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील सार्वजनिक वास्तूंचे पुनरुज्जीवन – राज्यमंत्री दत्तामामा भरणे

राज्यमंत्री दत्तामामा भरणे म्हणाले बीड जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे, यामध्ये अनेक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत असल्याचा मला आनंद होत आहे. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात अनेक सार्वजनिक वास्तूंचे पुनरुज्जीवन होत असल्याचेही श्री भरणे म्हणाले.

अमृत पेय जल योजनेचे 100% काम पूर्ण व्हावे – आ. संदीप क्षीरसागर

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. संदीप क्षीरसागर यांनी केले; बीड मधील आजच्या विकासकामांची माहिती देत त्यांनी बीड शहर व भागातील विविध मागण्या सर्व मंत्री महोदयांसमोर मांडल्या तसेच आज भूमिपूजन झालेली कामे पूर्ण झाल्यानंतर मा. अजितदादा पवार यांनी या कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रत्यक्ष बीडला यावे अशी विनंती केली.

बीड शहरात सुरू असलेलता अमृत पेय जल योजनेतून 90% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी प्रशासक व प्रशासनाने सहकार्य करून समन्वय साधावा असे साकडे आ. संदीप क्षीरसागर यांनी अजितदादा पवार यांना घातले. यास सकारात्मक प्रतिसाद देत अजितदादा पवार यांनी प्रशासक नामदेव टिळेकर यांना नगर परिषदेचे थकीत वीजबिल वसुली, दंड आकारणी यात सुवर्णमध्य साधून उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

या कार्यक्रमासाठी मुंबई मंत्रालयातून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , आरोग्यमंत्री राजेश टोपे , सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तामामा भरणे, आ. विक्रम काळे हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.

तसेच बीड येथे जिल्हा रुग्णालय परिसरात प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड , जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, मा. आ. अमरसिंह पंडित, मा. आ. सुनील धांडे, मा. आ. सय्यद सलीम, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर .राजा , पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सारिका गवते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे, पंचायत समितीचे पदाधिकारी, विविध यंत्रणातील अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच सर्व विकासकामांचे एकाच ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात औपचारिक भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय गिरी यांनी केले तर माजी आमदार सुनील दादा धांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here