“तुम्ही नुसतं बाबरीवर चढायचा प्रयत्न जरी केला असता…तरी बाबरी खाली आली असती”…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला…

फोटो- शिवसेना

न्यूज डेस्क – वांद्रे कुर्ला संकुलाच्या मैदानावर शिवसेनेची शनिवारी (१४ मे) रात्री मास्टर सभा पार पडली. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने घेतलेल्या या सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कोरोना काळानंतरची शिवसेनेची ही पहिला जाहीर सभा होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेत प्रथमच मास्क काढून मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मस्जिद केलेल्या विधानावर प्रत्युत्तर दिले.

व्यासपीठावर आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय राऊत, सुभाष देसाई आदी मंत्री उपस्थित होते. राज्यभरातून शिवसैनिक या सभेला आले होते. आदेश बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव यांचे धाकटे पुत्र तेजस या सभेला प्रथमच उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी बाबरी मशीद प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. बाबरी पडली, तेव्हा मी तिथे होतो, असं विधान काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी केलं होतं. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी टीका केली. “ते म्हणतात बाबरीच्या वेळी शिवसेना कार्यकर्ते नव्हतेच, मी गेलो होतो. तुमचं वय काय होतं तेव्हा? तेव्हा शाळेची सहल गेली होती का तिथे? तुमचं वय काय? बोलता किती? तुम्ही काय केलंय हिंदुत्वासाठी?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खोचक टोला देखील लगावला. “तुम्ही नुसतं बाबरीवर चढायचा प्रयत्न जरी केला असता, तरी बाबरी खाली आली असती. लोकांना श्रमच करायला लागले नसते. तुम्ही एक पाय टाकला असता तरी बाबरी खाली आली असती. आता हे म्हणतायत ती मशीद नव्हती. तो ढांचा होता. मग तेव्हा एवढं टिपेला का सांगितलं मंदीर पाडून मशीद बांधली?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता.

६ डिसेंबर रोजी मातोश्रीवर काय घडलं, याची आठवण यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितली. “बाबरी पडली तेव्हा मी बाळासाहेबांना सांगितलं की साहेब बाबरी पाडली. ते म्हणाले काय सांगतो? बाबरी पाडली. तेवढ्यात फोन वाजला. त्यांनी उचलला. समोरच्या माहितीवर ते म्हणाले, मग? जर शिवसेना कार्यकर्त्यांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. फोन ठेवल्यावर बाळासाहेब मला म्हणाले ही कसली यांची औलाद. जे लोकांना कारसेवा करायला बोलवत आहे. हे असलं पुचाट नेतृत्व आहे. नेतृत्वाचं लक्षण हेच असतं. जो नेता लोकांना भडकवून त्याने सांगितलेलं काम केल्यावर जबाबदारी झटकतो, तो नेता असूच शकत नाही. हेच काम भाजपानं केलंय. सुंदरसिंग भंडारी तेव्हा हेच म्हणाले होते की हे आम्ही केलेलं नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here