ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला ‘टोल’वाल्यांची चपराक…काँग्रेसचे टोलमुक्तीचे आंदोलन ठरले औटघटकेचे…

लेखी आश्‍वासनानंतरही मुजोर टोल व्यवस्थापनाने सुरू केली वसुली

प्रशांत देसाई,भंडारा

भंडारा – राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने अगोदर ते दुरुस्ती करा. त्यानंतरच वाहनधारकांकडून टोल वसुली करा, असा निर्वाणीचा इशारा देत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा चिरंजीव तथा युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी माथनी टोलनाक्यावर शुक्रवारला दुपारी आंदोलन करून वाहनांना ‘टोलमुक्त’ केले होते.

मात्र, काँग्रेसचे आंदोलक माघारी गेल्यावर टोल व्यवस्थापनाने अगदी तासाभरातच वाहनांकडून ‘टोल वसुली’ सुरू केली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसचे हे आंदोलन औटघटकेचे ठरले असून चक्क राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला ही झणझणीत चपराक दिली आहे.

नागपूर – कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मौदा तालुक्यातील माथनी येथे टोलनाका आहे. नागपूर ते भंडारा या ६० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे मागील काही दिवसांमध्ये अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व तर काहींना जीव गमवावा लागला आहे.

त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सदर माथनी टोलनाका व्यवस्थापनाचे असल्याने खड्डेमय रस्ता अगोदर दुरुस्त करावा, मगचं टोल नाक्यावरून धावणाऱ्या वाहनांची टोलवसुली करावी, या मागणीला घेऊन भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने माथनी टोल नाक्यावर शुक्रवारला दुपारी आंदोलन करून टोलनाका वसुली बंद पाडली होती.

या आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा मुलगा तथा युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले. या आंदोलनात भंडारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश कारेमोरे, युवक काँग्रेसचे महासचिव सचिन फाले, प्रिया खंडाते, शंकर राऊत यांच्यासह असंख्य काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आंदोलकांचा पवित्रा बघता माथनी टोलनाका व्यवस्थापनाच्यावतीने टोल इन्चार्ज प्रवीण चौबे यांनी शिष्टमंडळाला लेखी पत्र दिले. त्यात सदर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती होईपर्यंत कोणत्याही वाहनांकडून टोल वसुली करण्यात येणार नाही, असे नमूद केलेले आहे. सदर पत्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नावाने दिले आहे.

आंदोलनकर्त्यांना टोलनाका व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपाचे पत्र प्राप्त झाल्याने युवक काँग्रेसचे आंदोलनकर्ते समाधानी झाले. यानंतर वाहनांकडून वसुली होणार नाही, हे गृहीत धरून आंदोलनकर्ते माघारी परतले.

मात्र, आंदोलनाच्या अवघ्या तासाभरातच टोलनाका व्यवस्थापनाने येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांकडून पूर्ववत टोलवसुली सुरू केली. त्यामुळे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांना टोलनाका प्रशासनाने जोरदार चपराक देत त्यांच्या टोलमुक्ती आंदोलनाचा अक्षरशः फज्जा उडविला.

राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही आणि आंदोलनाचे नेतृत्व राज्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या मुलाने केलेले असतानाही टोल व्यवस्थापनाकडून अशी मुजोरी झाल्याने या आंदोलनाबाबत शंका उपस्थित होत आहे. युवक काँगेसच्यावतीने दुपारी केलेल्या या आंदोनलावर अनेकांनी चांगली प्रतिक्रिया देऊन टोलनाका बंद केल्याने समाधान व्यक्त केले होते. मात्र, सायंकाळ होताच टोल वसुली पूर्ववत सुरू झाल्याने आंदोलनाचा हा विषय आता चर्चेचा आणि सर्वत्र हास्याचा बनला आहे.

प्रतिक्रिया

  • असंख्य आंदोलन करते असल्याने त्यांच्या दबावात त्यांनी सांगितल्या नुसारच पत्र लिहून देण्यात आले. सदर टोलनाका हा शासनाचा असल्याने तो बंद किंवा चालू करण्याचा अधिकार शासनाला आहे. टोलनाका बंद करण्याचा मला अधिकार नाही. याबाबत शासनाला माहिती देण्यात आलेली आहे. आंदोलनामुळे टोल नाक्यावरील कर्मचारी भयभीत झाले असून आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षाविरुद्ध मौदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
  • प्रवीण चौबे
    टोलनाका इन्चार्ज, माथनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here