चित्रपट महामंडळाची निवडणूक लांबणीवर…

पुणे – विद्याधर कुलकर्णी

राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या ध्यानात घेऊन एकत्र येण्यावर आलेल्या बंधनामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

चित्रपट महामंडळाच्या घटनेनुसार निवडणूक प्रक्रियेला लागणारा कालावधी ध्यानात घेऊन शासनाच्या परवानगीनंतरच प्रक्रिया जाहीर करावी लागणार आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत २६ एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे.महामंडळाच्या घटनेनुसार निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होण्याच्या एक महिना आधी सर्वसाधारण सभा घ्यावी लागते.

त्या सभेमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून प्रक्रियेला सुरुवात होते.मात्र, लोकांच्या एकत्र येण्यावर राज्य शासनाने मार्चअखेरपर्यंत बंधने घातली आहेत.त्यामुळे शासनाने परवानगी दिल्यानंतरच महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा होऊन त्यामध्ये आगामी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याची माहिती चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.

राजेभोसले म्हणाले,   सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून एकत्र येण्यावर बंधने असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसली आहे.करोना प्रादुर्भावाची सबब पुढे करून महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कित्ता गिरवीत चित्रपट महामंडळ कार्यकारिणीला मुदतवाढ घेणार नाही.महामंडळाच्या घटनेनुसार मुदतवाढ घेता येत नाही.पाच वर्षांनी निवडणूक घ्यावीच लागते, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here