शिर्डीत द्वारकामाई व चावडीला मकराना मार्बल दानशूर साईभक्‍त श्री.के.व्‍ही.रमणी देणगीतून बसविण्‍यात आले…

न्यूज डेस्क – साईबाबांचे सलग ६० वर्षे वास्‍तव्‍य असणाऱ्या द्वारकामाई व चावडीत दानशूर साईभक्‍त श्री.के.व्‍ही.रमणी यांच्‍या देणगीतुन नुतन मकराना मार्बल बसविण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.

श्री.बगाटे म्‍हणाले, श्रींचे द्वारकामाईतील धुनीजवळील मुख्‍य भाग, ओटा व पाय-या यांचे जुने झालेले मार्बल, फ्लोरींग तसेच चावडीचा मुख्‍य भाग व व्‍हरांडा येथील जुने झालेले तंदुर स्‍टोन फ्लोरींग काढुन त्‍या ठिकाणी नविन प्‍युअर व्‍हाईट मकराना मार्बलचे फ्लोरींग बसविणे व द्वारकामाई सभामंडपातील मार्बल फ्लोरींगला पॉलीश करणे ही कामे साईभक्‍त श्री.के.व्‍ही.रमणी, चेन्‍नई यांचेकडून देणगी दाखल करुन घेण्‍यास तदर्थ समितीने मान्‍यता दिली होती.

त्‍यानुसार देणगीदार साईभक्‍त  श्री.के.व्‍ही.रमणी व त्‍यांचे बंधु श्री.भास्‍करण यांनी मकराना मार्बल जयपूर नजिक मकराना येथुन खरेदी करुन संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले. सदरचे मार्बल जयपूर येथील साईभक्‍त श्री.विवेक चुर्तवेदी यांनी स्‍वःखर्चाने शिर्डी येथे पोहच केले. तसेच याकामी जयपूर येथील ०३ कुशल कारागीर आवश्‍यक साहित्‍यांसह शिर्डी येथे पाठविले.

तसेच याकामी आवश्‍यक असणारे इतर सर्व साहित्‍य ही त्‍यांनी देणगी स्‍वरुपात दिले व सदरच्‍या मार्बलला पॉलीश करण्‍यासाठी नाशिक येथील कारागीराची व्‍यवस्‍थाही केली. याकामांकरीता सुमारे ०७ लाख रुपये श्री.चर्तुवेदी यांनी देणगी स्‍वरुपात खर्च केले असल्‍याचे श्री.बगाटे यांनी सांगितले.

द्वारकामाईतील कामाचा शुभारंभ दिनांक १८ जुलै २०२० रोजी होवुन दिनांक २२ ऑगस्‍ट २०२० रोजी पुर्ण झाले. दिनांक २२ ऑगस्‍ट रोजी श्रीगणेश चतुर्थीच्‍या मुहुर्तावर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते विधीवत पूजा करण्‍यात आली. तसेच दिनांक २५ ऑगस्‍ट २०२० रोजी चावडीतील मार्बल बसविण्‍याचे ही काम पुर्ण झाले.

सदरचे काम पुर्ण होण्‍यासाठी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे, बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, उप अभियंता संजय जोरी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, मंदिर प्रमुख रमेश चौधरी यांनी परिश्रम घेतले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here