क्रायमिन कांगो साथरोगाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ…

केंद्रीय सर्वेक्षण पथकाचा पालघर जिल्ह्यात पाहणी दौरा.

मनोर – पालघर जिल्ह्यात जनावरांच्या अंगावरील गोचिडांमुळे क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर (CCHF) या साथीच्या रोगाची लागण झालेला एकही रुग्ण नाहीं.तसेच गुजरात राज्याच्या सीमेलगतच्या भागातही या आजाराचा रुग्ण आढळलेला नाही.त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्र्वास ठेवू नये असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी शनिवारी केले आहे. पशुपालक आणि मांस विक्रेत्यांनी घाबरु नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

क्रायमिन आजाराच्या अफवांमुळे पालघर जिल्ह्यातील पशुपालक आणि मांस विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.हा रोग गुजरात राज्याच्या सीमेवरून महाराष्ट्राच्या सीमाभागातील जिल्ह्यात पसरण्याची शक्यता होती.त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्त कार्यालयामार्फत या रोगा संबंधी परिपत्रक जारी करण्यात आले होते.

परंतू या रोगाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीत जिल्ह्यात झालेला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.हा विषाणूजन्य रोग एका विशिष्ट प्रकारच्या गोचीडा द्वारे एका जनावरांमधून दुसऱ्या जनावरांना होतो. गोचीड चावल्याने किंवा बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्यास या रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये होतो.

नुकताच केंद्रीय सर्वेक्षण पथकाकडून पालघर जिल्ह्यात पाहणी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील आरोग्य व पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. यात आजारादरम्यान प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

यावेळी केंद्रीय सर्वेक्षण पथकातील अहमदाबाद मेडिकल कॉलेजचे डॉ प्रा कमलेश उपाध्याय,नॅशनल सेंटर नवी दिल्लीचे डॉ शंशिकात कुळकर्णी,नॅशनल इन्स्टिट्यूट पुणे येथील वैज्ञानिक डॉ योगेश गुरव,एनसिडीसीचे किटकशास्त्रज्ञ डॉ एस एन शर्मा,पालघरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ प्रशांत कांबळे आणि अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here