दिवाळीनंतर लेबर कॉलनी व विश्वास नगरमधील घरे पाडणारच; शासनाची निर्णायक भूमिका…

औरंगाबाद – ऋषिकेश सोनवणे

औरंगाबाद – लेबर कॉलनी, विश्वास नगरमधील घरे पाडण्याचे शासनाने नक्की केले आहे. यातील काही घरांना ५० वर्षे तर काहींना त्याहून अधिक कालावधी झाल्याने त्या सर्व घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यानुसार घरे धोकादायक बनली असून कधीही पडू शकतात. त्यात जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ती घरे पाडावीच लागतील, अशी माहिती दिली आहे.

दिवाळीनंतर ही प्रक्रिया सुरु होईल.शासकीय कर्मचाऱ्यांसाठी १९५३- ५४ आणि १९८० ते १९९१ यादरम्यान तीन रपयांत लेबर कॉलनीत घरे व अपार्टमेंट बांधण्यात आले होते. या निवासस्थानात राहणारे जवळपास सर्वच कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून घरे सोडली आहेत. या घरांवर इतर नागरिकांनी कब्जा केला आहे. बऱ्याच वर्षांपासून हे नागरिक या घरांमध्ये अवैधरीत्या राहात आहेत. त्यासर्वांना नोटीस देखील बजावण्यात आल्या आहेत.

परंतु त्यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.मोक्याच्या ठिकाणी असून शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे या जागेत प्रशासकीय इमारत अथवा इतर शासकीय कार्यालयांचे बांधकाम केले जाण्याची शक्यता आहे. ही २० एकर जागा आजच्या बाजारभावानुसार २ हजार कोटींची आहे. या सर्व घरांसह इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यानुसार घरे व इमारत राहण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने ही घरे पाडण्याची मोहीम येत्या ८ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. लेबर कॉलनीतील धोकादायक घरे पाडण्यासाठी ८ नोव्हेंबरला पोलिसांचा मोठा फौजफाटा नेण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांना नोटीसद्वारे अगोरदच घरे खाली करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे या कालावधीत घरातील सामान काढले नाही. तर प्रशासन बेधडकपणे कारवाई करेल. भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठीच ही मोहीम आहे, असेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here