कोगनोळी येथील अवैध वाहतुकीबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन; दहा दिवसांचा तोडगा काढण्याची मागणी…

अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा…

राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळी टोल नाका चुकवण्यासाठी कोगनोळी गावातून अवैध वाहतुकीचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. या वाहतुकीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून.

या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथील अवैध वाहतूक कायमची बंद व्हावी आणि जर ही अवैध वाहतूक दहा दिवसात बंद झाली नाही तर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल, असा इशारा कोगनोळी ग्रामस्थ व पत्रकार संघाच्या वतीने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनाच्या प्रती चिक्कोडी प्रांताधिकारी, निपाणी तहसीलदार, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनाही देण्यात आलेले आहेत.सदर निवेदनावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील, प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे चेअरमन अनिल चौगुले, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, कृष्णात खोत, युवराज कोळी यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका चुकविण्यासाठी चार चाकी खाजगी वाहनांपासून ते सोळाचाकी अवजड वाहनांपर्यंत सर्वच वाहने कोगनोळी गावातून प्रवास करत असतात. याच मार्गावर अनेक शाळा, आठवडी बाजार, विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची रहदारी असते. काही दिवसांपूर्वीच एका तरुणाचा या अवैध वाहतुकीमुळे बळी गेला आहे.

त्यामुळे ही अवैध वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अवैध वाहतुकीबाबत नागरिकांतून तीव्र आक्रोश व्यक्त होत आहे. याचीच दखल घेऊन कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने व कोगनोळी पत्रकार संघाच्या वतीने बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांना लेखी निवेदन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यासाठी प्रशासनातील अधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दहा दिवसांत तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली असून या दहा दिवसात ही अवैध वाहतूक बंद झाली नाही, तर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी योग्य ती कार्यवाही करून अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

यावेळी तात्यासाहेब कागले, पूनम डांगरे, राजू शिंत्रे, कृष्णात भोजे, संजय पाटील यांच्यासह कोगनोळी पत्रकार संघाचे विठ्ठल कोळेकर, अनिल नवाळे, बाबासो हळिज्वाळे, राहुल मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here