नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये उडान उन्हाळी शिबीर २०२१ अंतर्गत भेट वस्तू व प्रमाणपत्राचे वितरण…

सागली – ज्योती मोरे.

नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये स्वावलंबनाचे शिक्षण देणारे मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स अंतर्गत मे 2021 मध्ये विद्यार्थी उपक्रमशील बनावा या हेतूने उडान शिबीर घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मधील सुप्त गुणांना व कौशल्याला वाव देऊन त्यांच्यातील सृजनशीलता वाढावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आज बुधवार दि 27 ऑक्टोबर 2021 रोजी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. अधिकराव पवार सर यांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांची उपक्रमशीलता तसेच प्रयोगशीलता वाढीस लागावी म्हणून विद्यार्थ्यांनी कृतिशील बनावे, आपल्यातील उपजत कौशल्यांना वाव द्यावा असे सांगितले.

भविष्यामध्ये भावी पिढीला कृतिशील शिक्षणाचा जगण्यासाठी बळ देईल असा संदेश दिला.तसेच विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याहेतूने शाळेने सन 2017 पासून मल्टि स्किल फौंडेशन कोर्स ची सुरवात केली.यामधून विद्यार्थाना शेती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण,अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान इत्यादी विषयांची प्रात्यक्षिके घेतली जातात.

शेती तंत्रज्ञान विभागांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीच्या कामाचे ज्ञान अवगत व्हावे या हेतूने बागकाम तंत्रज्ञान, रोपवाटिका तंत्रज्ञान ,सेंद्रिय खत तयार करणे ,शेतीच्या मशागतीची कामे करणे, भाजीपाला लागवड इत्यादीचे प्रत्यक्ष ज्ञान दिले जाते.अभियांत्रिकी विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना वेल्डिंग करणे , दैनंदिन जीवनात लागणाऱ्या घरगुती वस्तू उदाहरणार्थ टेबल-खुर्च्या , पाट तयार करणे ,तसेच बांधकामाचे प्राथमिक ज्ञान प्रत्यक्ष कृतीद्वारे दिले जाते.

ऊर्जा आणि पर्यावरण या विभागांमध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल साहीत्य माहिती व हाताळणी, सर्किट तयार करणे, अर्थिंग विषयी माहिती, हाउस वायरिंग विषयी प्रत्यक्ष ज्ञान दिले जाते.अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान या विभागांमध्ये विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ टिकवण्याच्या पद्धती, संतुलित आहार, पदार्थातील भेसळ ओळखणे, केक, लोणची, विविध प्रकारच्या चटण्या तयार करणे, त्याचबरोबर तयार केलेल्या खाद्यपदार्थाचे लेबलिंग व पॅकिंग करणे इत्यादीचे ज्ञान दिले जाते याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये करिअर निवडीसाठी होतो.

या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या घरी स्वतः फॅन दुरुस्ती करणे, फॅन बसवणे, फ्यूज दुरुस्ती करणे, सर्किट चेक करणे, तसेच घरगुती खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री करणे.सुपल्या, विळती, कुंड्या तयार करून त्याची विक्री केलेली आहे.

अशाप्रकारे आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बहुविध कौशल्याधिष्ठित या कोर्समधून अभ्यासाबरोबरच भविष्यामध्ये लघुउद्योग त्यांना सुरु करता येईल एवढे ज्ञान प्राप्त केलेले आहे असे दिसून येते कोरोना कालावधीनंतर प्रथमच शाळा या ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांवर आधारित कौशल्याधिष्ठित शिक्षण देणे सुरू आहे.

इयत्ता आठवीपासून हा कोर्स विद्यार्थ्यांना शिकवला जातो. या उडान शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत अवगत केलेल्या कृतिशील शिक्षणाचा उपयोग टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू ,शोभेच्या कुंड्या, घरच्याघरी शेतीचे तंत्रज्ञान इत्यादी वर आधारित उपक्रम तयार केले होते. पारितोषिक विजेते विद्यार्थी पृथ्वीराज सटाले, स्मितेश शहापुरे ,प्रणाली पाटील, श्रेयस पाटील ,गायत्री कुंभार, श्रीयश शिंदे या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक माननीय श्री प्रवीण शेठ लुंकड, सचिव एन जी कामत सर, स्कूल कमिटी चेअरमन डॉक्टर यशवंत तोरो सर मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर, संस्थेच्या एचआर मॅनेजर सौ गीतांजली पाटील देशमुख मॅडम, मल्टी स्किल कोर्स चे प्रमुख श्री अनिरुद्ध बनसोड सर यांच्या मार्गदर्शना खाली हा कोर्स सुरू आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सुनीता भोसले मॅडम यांनी केले.

तसेच मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स चे समन्वयक श्री अनिरुद्ध पाटील सर यांनी उडान शिबिरा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.या साठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स चे निदेशक श्री विलास राठोड, सागर नंदीवाले, सुफियान नदाफ, रेणुका पांगम मॅडम त्याच बरोबर प्रशालेचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here